Drought In Marathwada : पाण्याअभावी पांढरे सोने काळवंडले, सोयाबीनही करपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:34 PM2018-10-13T12:34:34+5:302018-10-13T12:37:10+5:30
दुष्काळवाडा : मंठा तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरणीचा खर्च निघणे अवघड झाले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने उमरखेडा परिसरात पाहणी केल्यानंतर हे दुष्काळचित्र समोर आले.
- पांडुरंग खराबे, उमरखेडा, ता. मंठा, जि. जालना
मंठा तालुक्यात यावर्षी अपुरा पाऊस पडल्याने खरिपाच्या पेरणीचा खर्च निघणे अवघड झाले आहे. ‘लोकमत’ प्रतिनिधीने उमरखेडा परिसरात पाहणी केल्यानंतर हे दुष्काळचित्र समोर आले. या गावालगत मोठा डोंगरपट्टा आहे. पावसाअभावी सोयाबीन करपले असून कपाशी जळत आहे. बाजरीचे पीक हातभरच वाढले असून, तूर फुलाविनाच दोन दोन फुटांवर थांबली आहे. खरीप गेले आता रबीची पेरणी होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
मंठा तालुक्यातील ११७ गावांपैकी सर्वच गावांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे संपूर्ण तालुकाच दुष्काळाच्या छायेत आहे. जून महिन्यात बऱ्यापैकी पाऊस झाल्याने मोठ्या उत्साहात शेतकऱ्यांनी कपाशीसह सोयाबीन, तूर, बाजरीची पेरणी केली. नंतर पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन करपले. कापूस दोन फुटांपेक्षा जास्त वाढला नाही. बाकी पिकांची स्थिती तशीच आहे. त्यातच विहिरींचे पाणी वाढले नाही. नदी, नाल्यांना पाणी नाही. भविष्यात पाऊस पडला नाही तर माणसाला व जनावरांना पिण्याचे पाणीही मिळणार नाही.
उमरखेडा गावाजवळूनच वाहणारी तळतोंडी येथील नदी कोरडीठाक असून, मंठा नदीही पाण्याच्या शोधात आहे. पाझर तलावही पूर्णपणे आटले आहेत. डोंगरभाग असल्याने पावसाळ्यातच सर्वत्र उन्हाळा दिसत आहे. पाण्याबरोबरच चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सोयाबीनला एकरी तीन क्विंटलपेक्षा जास्त उतारा नाही. हे गाव शंभरटक्के शेतीवर व शेतमजुरीवर अवलंबून आहे.
पाऊस कमी आणि त्यातच कपाशीवर बोंडअळीने हल्ला चढविल्याने उत्पादन घटणार आहे. बोंडअळीनंतर आता कपाशी काढणीला आली आहे. असे असतानाच थ्रीप्स या रोगाचाही प्रभाव वाढल्याचे चित्र आहे. एकुणच शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडत आहे. मंठा तालुक्यात सरासरी ५३३ मि.मी. पाऊस पडला असून, तो वार्षिक सरासरीपेक्षा कमी आहे. पावसाची सरासरी ५३३ असली तरी जून, जुलै महिन्यात पाऊस झाला. नंतर तो बरसलाच नसल्याने पिके वाया गेली आहेत.
उमरखेड दृष्टीक्षेपात
९०४ हेक्टर - पेरणी यीग्य क्षेत्र
८५० हेक्टर - खरीपाची पेरणी झाली
३०० हेक्टर - कपाशीचे क्षेत्र
३५० हेक्टर - सोयाबीन क्षेत्र
४४. ५४ - एकूण पैसेवारी
११३ - महसुली गावे
खरीप गेले, रबीचे अवघड
उमरखेडा परिसरासह मंठा तालुक्यातील अन्य गावांमध्येही भयावह चित्र आहे. कृषी विभागाकडून शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले. बोंडअळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कामगंध सापळे मोठ्या प्रमाणावर बसवून या अळीला रोखण्यासाठी आम्ही थेट बांधावर गेलो होतो; परंतु त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आता खरिपाप्रमाणेच रबीची पेरणी करण्यासाठीचे पोषक वातावरण नसल्याचे वास्तव आहे. अद्याप नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश आले नाहीत.
- एस.डी. गोंधणे, तालुका कृषी अधिकारी, मंठा
बळीराजा काय म्हणतो?
- पाऊस न पडल्याने हातचे पीक गेले. सर्व शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शासनाने संपूर्ण कर्ज माफ करायला पाहिजे. - काशीनाथ जाधव
- महागडा खर्च करून काहीच उपयोग झाला नाही. अनेकांना गाव सोडून पोट भरण्यासाठी मुंबई, पुण्याला जावे लागणार आहे. - नारायण डोंबे
- यावर्षी पाऊस नसल्याने आमचे सोयाबीन गेले. कापूसही वाढला नाही. त्यामुळे उसनवारी कोणी करीत नाही. आज आठवडी बाजार असल्याने पैशाअभावी बाजाराची थैली रिकामीच आणावी लागली. - पार्वतीबाई खेत्रे
- यावर्षी पावसाने दगा दिल्याने पेरणीचा खर्च वाया गेला. सोयाबीनला उतारा नाही आणि भावही नाही. त्यामुळे काय करावे, कळेना. - आनंद जाधव
- आमच्या तालुक्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यातच आमचे गाव डोंगराळ भागात येत असल्याने पिके जळून खाक झाली आहेत. शासनाने रोजगार हमीचे कामे सुरू करावी. - गणेश पवार
- माझी कोरडवाहू शेती आहे. सोयाबीनला एकरी तीन क्विंटलचा उतारा आला. खर्चही फिटला नाही. कपाशी पूर्ण वाळत आहे. बाकी पिकांची स्थिती तशीच आहे. - आसाराम खेत्रे