एका तासात दोन गावातील दुष्काळाची पाहणी करून केंद्रीय पथक भुर्रऽऽ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:20 PM2018-12-06T13:20:03+5:302018-12-06T13:22:18+5:30
आॅन द स्पॉट :
- संजय देशमुख
जालना : जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा २४ टक्के कमी पाऊस झाला. त्यामुळे खरिपात पेरणी झाली. मात्र, नंतर पावसाच्या सततच्या खंडामुळे सारेच साफ झाले. परतीचा पाऊसही न झाल्याने रबीची पेरणी केवळ १८ टक्के झाली. जिल्ह्यातील या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी बुधवारी जिल्ह्यात आलेल्या केंद्रीय पथकाचा दौरा तासाभरात गुंडाळला.
या पथकाने बुधवारी जिल्ह्यातील जवसगाव आणि बेथलम या गावांची पाहणी केली. पथक येणार म्हणून जवसगाव आणि बेथलम येथे सकाळी १० वाजेपासूनच शेतकरी तसेच महसूल, कृषी आणि अन्य विभागाचे अधिकारी हजर होते. ११ वाजता येणारे केंद्रीय पथक दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी जवसगावात पोहोचले.
जवसगाव
अधिकाऱ्यांनी जवसगाव येथे प्रथम जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे आणि आ. नारायण कुचे यांच्याशी काही वेळ चर्चा करून आपला मोर्चा थेट सुखदेव अंभोरे यांच्या कपाशीच्या शेतात वळविला. सुवर्णा अंभोरे, शीलाबाई हिवाळे यांच्यासह जवसगावचे सरपंच दत्तात्रय वैद्य, उपसरंच भारतचंद गंगाखेडे, बालाजी गारखेडे, ग्रामसेवक व्ही.के. सोनवणे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जवसगावाचे एकूण पेरणीलायक क्षेत्र ७७८ हेक्टर असल्याचे सांगण्यात आले, तसेच कमी पाऊस झाल्याने या भागातील भूजल पाणीपातळी चक्क दहा फुटाने खाली गेल्याचे सांगण्यात आले. केंद्रीय पथकातील अधिकारी मानस चौधरी यांनी सुवर्णा अंभोरे यांना काही प्रश्न विचारले. कपाशीची लागवड कधी केली? गेल्यावर्षी किती उत्पन्न झाले होते? यंदा किती झाले? हे उत्पन्न कमी होण्याचे प्रमुख कारण काय? १७ आॅगस्टनंतर या भागात पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामाचे उत्पन्न थेट ७० टक्यांनी घटल्याचे अंभोरे यांनी सांगितले.
यासाठी पीककर्ज काढले होते, या प्रश्नावर त्यांनी होकार देऊन एसबीएच बँकेकडून किसान के्रडिट कार्डच्या माध्यमातून नवीन-जुने करून प्रारंभी ३२ हजार रुपये आणि नंतर ८० हजार रुपये कर्ज घेतल्याचे सांगितले. गेल्या वर्षी याच चार एकर जमिनीतून ९ क्विंटल कपाशीचे आणि तुरीचे चांगले उत्पन्न झाले होते. यंदा या चार एकरांतून केवळ दोन क्विंटल कापसाचे उत्पादन निघाल्याचे अंभोरे यांनी सांगितले. पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून केंद्र सरकारने लागू केलेल्या पंतप्रधान पीक विमा योजनेतून विमा काढला का? या प्रश्नावर उपस्थित शेतकऱ्यांनी होकार देऊन तो यंदाही काढल्याचे सांगितले. विमा काढण्यासाठी महसूल, तसेच बँक आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात भेटी दिल्या का? यावर शेतकऱ्यांनी नकारात्मक मान डोलावली. जवसगाव येथे हे पथक २५ मिनिटे थांबून बेथलमकडे रवाना झाले.
बेथलम
केंद्रीय पथक येणार म्हणून येथील जवळपास ३० ते ४० शेतकरी हे सकाळपासूनच वाट पाहत उभे होते. पथकातील गाड्यांचा ताफा दुपारी १ वाजेच्या सुमारास बेथलममधील प्रकाश जयसिंग निर्मळ यांच्या ज्वारीच्या शेतात जाऊन थांबला. यावेळी निर्मळ यांनी त्यांना आलेला खर्च, तसेच उत्पादनाचे बिघडलेले गणित समजावून सांगितले. यावेळी दीपक सिंघला यांनी पिण्याच्या पाण्याची स्थिती विचारली असता तीदेखील गंभीर असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यावेळी पीककर्ज, पीकविमा यासंदर्भातही विचारणा करण्यात आली. बेथलम येथील पाहणी या पथकाने १५ मिनिटांत आटोपली.