दुष्काळाचा पंचनामा; जिल्ह्यात ना चारा.. ना पाणी...ना छावणी...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 12:58 AM2019-03-07T00:58:38+5:302019-03-07T00:59:29+5:30
एकीकडे प्रशासन दुष्काळी आढावा बैठकीत माना डोलावून लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देतात. परंतु प्रत्यक्षात स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र दिसून आले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा पावसाने पुन्हा एकदा दगा दिला आहे. याचे परिणाम एकूणच शेती आणि ग्रामीण भागावर भीषणतेने जाणवत आहेत. एकीकडे प्रशासन दुष्काळी आढावा बैठकीत माना डोलावून लोकप्रतिनिधींना प्रतिसाद देतात. परंतु प्रत्यक्षात स्थिती अत्यंत गंभीर असल्याचे चित्र दिसून आले. निमित्त होते ते, शिवसेनेकडून गेल्या तीन दिवसांमध्ये थेट २२ गावांमध्ये जाऊन आॅन दी स्पॉट रिपोर्ट घेण्यात आला. यावेळी कुठलेच राजकारण न करता केवळ दुष्काळावरच शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर दुष्काळाची दाहकता मन हेलावून टाकणारी आहे.
जालना जिल्ह्यात यंदा सरासरीच्या तुलनेत केवळ ६२ टक्के पाऊस झाला. त्यामुळे खरीप आणि रबी हंगामातील पिकांना याचा मोठा फटका बसला. यातूनच शेती आणि शेतीवर आधारित ग्रामीण जीवन पूर्णपणे कोलमडले आहे. जालना तसेच लगतच्या बदनापूर तालुक्याचा दौरा गेल्या तीन दिवसांत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केल्याची माहिती जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर यांनी दिली. ते म्हणाले की, आज ज्या गावात आम्ही थेट गेलो तेथे आमचे स्वागत हे नेहमीप्रमाणे आनंदाने केले नाही, पटकन कोणी पाणी आणि चहा घ्या, असेही म्हटले नाही. परंतु आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांना नाराज न करण्याची परंपरा आहे, त्यामुळे जड मनाने ‘या बसा, कोणी कडे दौरा केला? अद्याप निवडणुका लांब आहेत, तुम्ही प्रचार आतापासून सुरू केला का? कोण आहे आपला उमेदवार?’ असे एक ना अनेक प्रश्न विचारण्यात येते होते.
मात्र आम्ही प्रचारासाठी नव्हे तर वास्तव परिस्थिती जाणून घेण्यासाठी आलो असल्याचे सांगितल्यावर बसण्यास सतरंजी अथवा घोंगडी आणण्याची लगबग सुरू होत असते. एकूणच आज गावातील गुरांचा सांभाळ हा माणसांपेक्षाही महाग झाला आहे. एक चाºयाची पेंडी ही ४० रूपयांवर पोहोचली आहे. दिवसभरातून एका बैलाला किमान पाच पेंड्या लागतात तर किमान दहा ते १२ बारा लिटर पाणी लागते. हे आणायचे कुठून, असा प्रश्न काही शेतकऱ्यांनी केला. चारा छावणीला का दावणीला या प्रश्नात अद्याप प्रशासन गुंतले आहे. जिल्ह्यात एवढी भयावह दुष्काळी स्थिती असताना एकही चारा छावणी सुरू झाली नसल्याने शेकºयांनी आश्चर्य व्यक्त केले. टँकर सुरू करण्यासाठी देखील नियमांचा बागूलबुवा केला जात आहे. एकूणच महिलांनी देखील आपल्या पाणी आणण्यासाठीच्या व्यथा मोठ्या विदारकपणे मांडल्या.
जालना जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. प्रशासन काहीच करत नाही, हे म्हणणे चुकीचे ठरेल. परंतु परिस्थिती हाताबाहेर गेल्याने ग्रामीण भागात जगणे अवघड झाले आहे. प्रशासनाकडून दुष्काळी भागात मदत करत असताना थोडेफार नियम हे लवचिक करणे गरजेचे आहे. प्रत्येक वेळेलाच नियमावर बोट ठेवून चालल्यास परिस्थिती निवळणे अवघड होणार आहे. आज चा-याचे भाव गगनाला भिडले असून, आगामी काळात चाºयाचे भाव प्रतिशेकडा हे ५ हजार रुपयांवर पोहचतील, अशी भीती शेतक-यांनी व्यक्त केली आहे.
दुष्काळात सापडलेल्या शेतक-यांना सर्वकाही मदत ही सरकार आणि प्रशासनाकडून मिळेल, हे शक्य नाही. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, उद्योजक यांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. अनावश्यक होणा-या खर्चाला फाटा देवून शेतक-यांना मदत करण्याची हीच खरी वेळ असल्याचे दौ-यातून दिसून आल्याची माहिती भास्कर अंबेकर यांनी दिली.