जालन्यात ‘ड्रायपोर्ट’ची गती मंदावली : सहा वर्षांत केवळ पायाभूत सुविधांचीच उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 07:07 PM2021-07-27T19:07:15+5:302021-07-27T19:09:03+5:30
jalana Dry Port News : २०१५ मध्ये तत्कालीन भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्टट्रस्ट अंतर्गत जालना आणि विदर्भातील वर्धा येथे जमिनीवरून पोर्टची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते.
जालना : मोठा गाजवाजा करून जालन्यात सहा वर्षांपूर्वी ड्रायपोर्टचे काम सुरू झाले. परंतु यातील केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचे खाते बदलल्यानंतर या प्रकल्पाची गती मंदावली. सहा वर्षांपासून येथे केवळ रस्ते, रेल्वे पटरी टाकणे एवढीच कामे झाली असून, तीदेखील केवळ ६५ एकरवर झाली आहेत. हा प्रकल्प जालना तालुक्यातील दरेगाव शिवारात ५०० एकरवर प्रस्तावित आहे.
२०१५ मध्ये तत्कालीन भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून जेएनपीटी अर्थात जवाहरलाल नेहरू पोर्टट्रस्ट अंतर्गत जालना आणि विदर्भातील वर्धा येथे जमिनीवरून पोर्टची निर्मिती करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. त्यानुसार जालन्यात दरेगाव शिवारात ५०० एकर गायरान जमीन मिळाल्याने हा प्रकल्प येथे उभारण्याचे ठरले. ती जागा संपादित करून जेएनपीटीकडे वर्ग करण्यात आली. यात आतापर्यंत संपूर्ण परिसरात सुरक्षा भिंत-वॉल कम्पाउंड बांधण्यात आली असून, दिनेगाव रेल्वेस्थानकाला जोडणार दुहेरी रेल्वेमार्ग टाकण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. रेल्वे रुळावरून उड्डाण पुलाचे काम पूर्ण झाले असून, हा पूल नंतर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे.
जालन्यातील या ड्रायपोटमुळे कृषी तसेच अन्य औद्योगिक माल हा थेट परदेशात निर्यात करता येणार आहे. त्यासाठी येथे कस्टम क्लिअरन्सचे कार्यालय होणार असून, त्याला मंजूरी मिळाली आहे. त्यामुळे येथून निर्यात करण्यात येणारा माल हा जेएनपीटीतून थेट बोटींमध्ये चढवून तो त्या-त्या देशांना रवाना करता येणार आहे. यामुळे जेएनपीटीत कस्टम क्लीअरन्ससाठी लागणारा मोठ वेळ कमी होणार आहे.
सोनवाल यांनी घेतला आढावा
नव्याने जहाजबांधणी आणि बेटांचे नियोजन हा विभाग केंद्रीयमंत्री सोनवाल यांच्याकडे आला आहे. त्यामुळे त्यांनी नुकताच या प्रकल्पाचा आढावा घेतला असून, हा प्रकल्प लवकरात लवकर सुरू करण्याबाबत जेएनपीटीला सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. या आधीदेखील जेएनपीटीचे व्यवस्थापकीय संचालकांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन कामाला गती देण्याचे प्रयत्न केले. या प्रकल्पाला गती देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सतत पाठपुरवा करत असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
ड्रायपोर्ट म्हणजे केवळ दिखावा
ड्रायपोर्टच्या नावावर सत्ताधारी मंडळी ही सहा वर्षांपासून केवळ खोटी स्वप्ने दाखवत आहे. आजघडीला या परिसरात चार ते पाच किलोमीटरचा रेल्वेट्रॅक उभारण्याचे काम सुरू आहे. अन्य कुठल्याही बाबतीत येथे पाहिजे ते प्रकल्प सुरू झालेले नाहीत. त्यामुळे हा प्रकल्प म्हणजे केवळ दिखावा असून, त्यातून हा प्रकल्प चांगला असला तरी त्याच्या कासवगतीमुळे तो रखडला आहे.
-भीमराव डोंगरे, माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस