कोरोनामुळे यंदाही रमजान महिन्यातील नमाज घरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:29 AM2021-04-17T04:29:48+5:302021-04-17T04:29:48+5:30
टेंभुर्णी- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, दुसऱ्या वर्षीही रमजान महिन्यातील नमाजसह अन्य धार्मिक विधी मुस्लिम बांधव आपापल्या घरीच पार पाडत ...
टेंभुर्णी- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, दुसऱ्या वर्षीही रमजान महिन्यातील नमाजसह अन्य धार्मिक विधी मुस्लिम बांधव आपापल्या घरीच पार पाडत आहेत. यामुळे सध्या घराघरांतून भल्या पहाटेपासून कुराण पठण व इतर धार्मिक विधींचा सूर कानावर पडत असल्याचे चित्र टेंभुर्णीसह परिसरात दिसून येत आहे.
मुस्लिम समाजाचा पवित्र उपवासाचा महिना माहे रमजानला बुधवारपासून प्रारंभ झाला. या महिन्यात प्रत्येक पुण्यकर्माचे फल सत्तर पटीने वाढून मिळत असल्याने सर्वच मुस्लिम हा महिना आपल्या आयुष्यात लाभणे, हे परमभाग्य समजत असतात. या महिन्यात संपूर्ण दिवसभर उपवास (रोजा) ठेवणे, कुराण पठण, अल्लाहचे नामस्मरण, विशेष नमाज तरावीसह दिवसभरात पाच वेळची नमाज अदा करणे, जकात व इतर दानधर्म आदी धार्मिक विधी मुस्लिम समुदाय मोठ्या भक्तिभावाने करीत असतो.
एरव्ही या महिन्यात संपूर्ण महिनाभर मस्जिदी भाविकांनी दिवसभर हाऊसफुल्ल दिसायच्या. सायंकाळी प्रत्येक मस्जिदमध्ये इफ्तारच्या वेळामध्ये सर्वच रोजेदार एकत्र उपवास सोडायचे. अनेक ठिकाणी अन्य धर्मिय बांधवांकडूनही आपल्या मुस्लिम मित्रांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन केले जायचे. यामुळे मस्जिदीमध्ये एकच रेलचेल दिसायची. मात्र, गतवर्षी या दिवसांत कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने सर्वच मुस्लिमांना संपूर्ण महिनाभर घरीच इबादत करावी लागली. यावर्षीही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा डोके वर काढत असल्याने मुस्लिम बांधव रमजानचे सर्व विधी घरीच करीत आहेत. अनेक ठिकाणी शुक्रवारच्या नमाजसह विशेष नमाज तरावीही घरीच अदा केली जात आहे. कोरोनासारख्या संक्रमित आजारामुळे सतत दुसऱ्या वर्षी रमजानचे सर्व धार्मिक विधी घरीच करावे लागत असल्याने अनेकजण भावूक होताना दिसत आहेत.
चौकट
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. अनेक ठिकाणी रुग्णांना वेळेवर बेडदेखील उपलब्ध होत नसल्याने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येते. अशावेळी कुठेही गर्दी न करणे, मास्कचा नियमित वापर, वेळोवेळी हात धुणे हेच पर्याय आपल्या हाती आहेत. अशाप्रकारच्या संक्रमित आजारात सर्वांनी प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचा संदेश प्रेषित मोहम्मदांनी हदिसद्वारे दिला आहे. अशा स्थितीत नमाज घरीच अदा केली तरी भक्ताच्या पुण्यफलात कुठलीही कमी केली जात नाही. कारण अल्लाह करुणेचा सागर आहे.
म. इद्रीस खान, सेवानिवृत्त एपीआय, टेंभुर्णी.
फोटो- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रमजानमधील पहिल्या शुक्रवारची विशेष नमाज घरीच अदा करताना टेंभुर्णी येथील मुस्लिम कुटुंबीय.