मधमाशांचे प्रमाण घटल्याने शेवग्याला शेंगा लागेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:58 AM2021-03-04T04:58:00+5:302021-03-04T04:58:00+5:30
शेषराव वायाळ परतूर - शेवगा या पिकाच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे यंदा शेवगा पिकाला ...
शेषराव वायाळ
परतूर - शेवगा या पिकाच्या परागीकरणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मधमाशांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे यंदा शेवगा पिकाला शेंगा लागत नाही. परिणामी, उत्पादक शेतकरी चिंतेत असून, कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
परतूर तालुक्यात मागील काही वर्षांपासून शेवगा लागवडीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शेवगा या पिकाला कमी प्रमाणात पाणी लागते. तसेच आठ ते नऊ महिन्यात उत्पादन सुरू होते. त्यातच या पिकाला बाजारात मोठी मागणी देखील आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी मुख्य पीक म्हणून शेवगा लागवड करतात. शेवगा पिकाच्या परागीकरणासाठी मधमाशा महत्त्वाची भूमिका बजावतात. शेवगा हे पीक स्व परागीकरण करू शकत नसल्याने फुलास परागीकरणावर अवलंबून रहावे लागते. फुलातील मकरंद घेण्यासाठी मधमाशा या फुलावरून त्या फुलावर जातात. त्यांच्या पायाला परागकण चिकटून फलन होते व त्याचे रूपांतर फळात म्हणजे शेंगात होण्यास मदत होते. परंतु, यंदा मधमाशांचे प्रमाण घटल्याने शेवगा पिकाला शेंगा येत नाही. त्यामुळे शेतकरी हैराण असून, कृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची मागणी करण्यात आली आहे.
चौकट
शेवगा परागीकरणात मधमाशांची महत्त्वाची भूमिका आहे. यावर्षी वातावरणातील बदल व इतर कारणांनी मधमाशांंचे प्रमाण कमी झाले आहे. शेवगा या पिकाला पाणी कमी लागते, ढगाळ वातावरणात फुलगळ होते. शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्यास या संकटावर मात करता येते. मधमाशांना आकर्षित करण्यासाठी गुळात गोणपाटाचे तुकडे भिजवून शेवग्याच्या शेतात योग्य ठिकाणी अडकवून ठेवल्यास याचा चांगला फायदा होतो.
रूस्तुम बोनगे, कृषी अधिकारी,परतूर
===Photopath===
020321\02jan_7_02032021_15.jpg
===Caption===
परतूर येथील एका शेतातील शेवगा पिकाला शेंगा लागत नसल्याचे दिसून आले.