रिमझिम पावसामुळे जालना जिल्ह्यात पेरण्यांची लगबग सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:54 AM2018-07-12T00:54:30+5:302018-07-12T00:54:49+5:30
जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवडीची लगबग सुरु केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत आहे. परिणामी शेतकऱ्यांनी पेरण्या व लागवडीची लगबग सुरु केली आहे. तर भोकरदन व जाफराबाद तालुक्यात अद्यापही पेरणी योग्य पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे.
जून च्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला. त्यामुळे काही शेतक-यांनी कपाशीची लागवड व पेरणी केली होती. परंतु, त्या गेल्या पावसाने १५ ते २० दिवस उघडीप दिली. परिणामी शेतक-यांनी लागवड केलेली पिके करपून गेली. तसेच तीव्र पाणीटंचाईचे सावटही उभे राहिले होते. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात सापडला होता. मात्र, गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यातील जालना, अंबड, परतूर, मंठा, बदनापूर, घनसावंगी या तालुक्यामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत पडल्याने बळीराजा सुखावला असून, राहिलेल्या शेतक-यांनी पेरणी व कपाशीची लागवड सुरु केली आहे. काही भागामध्ये सध्या पेरणीत आणि कपाशी लागवड करण्यात मग्न असल्याचे दिसून आले.
पावसाची प्रतीक्षा
जिल्ह्यातील इतर तालुक्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु असून येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात पेरण्या व लागवडीत गुंतला आहे. असे असले तरी अद्यापही जिल्ह्यातील भोकरदन, जाफराबाद हे तालुके चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असून येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.