सरकारच्या धोरणांमुळेच शेतकरी, कामगार भिकेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 01:08 AM2019-08-25T01:08:06+5:302019-08-25T01:09:29+5:30
केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रथम शेतकरी नागावला गेला आणि आता कामगार देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. फसव्या घोषणा आणि चुकीचे अर्थकारण यामुळे देशावर हि परिस्थिती ओढावली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
तीर्थपुरी : केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे प्रथम शेतकरी नागावला गेला आणि आता कामगार देशोधडीला लागण्याची स्थिती निर्माण झाली आहे. फसव्या घोषणा आणि चुकीचे अर्थकारण यामुळे देशावर हि परिस्थिती ओढावली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा शनिवारी घनसावंगी येथे दाखल झाली होती. यात्रेनिमित्त जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. पुढे बोलताना जयंत पाटील यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळातही मंदीची लाट होती. परंतु, त्यात नोकऱ्यांवर गदा आली नव्हती. नोटबंदी, जीएसटी यामुळे आज उद्योग, व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.
शेतकºयानंतर आता कामगारांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडण्यासाठी भाजपाकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. असे असले तरी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सैरभैर होऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले.
आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष नव्या उमेदीने उभारी घेईल, यात शंका नसल्याचे सांगून त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर आजही लोकांचा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
यावेळी रूपाली चाकणकर यांनीही मार्गदर्शन केले. राज्यात महिला सुरक्षीत नसल्याचे सांगून अन्याय-अत्याचार वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, खा. अमोल कोल्हे, माजी आ. संजय वाघचौरे, उमेश पाटील, अरविंद चव्हाण, चंद्रकांत दानवे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख, महेबूब शेख, विक्रम पडवळ, अमोल मिटकरी, उत्तम पवार, तात्यासाहेब उडाण, बबलू चौधरी, अमरसिंह खरात, जि.प.चे उपाध्यक्ष सतीश टोपे, कल्याण सपाटे, सतीश हांडे आदींची उपस्थिती होती.
सुडाचे राजकारण केले नाही : टोपे
प्रास्ताविकात बोलताना माजी आमदार राजेश टोपे म्हणाले की, आपण कधीच सुडाचे राजकारण केले नाही. जनतेच्या हिताला नेहमीच प्राधान्य दिले. पाच वर्षात संघर्ष करून निधी मिळविला.
तसेच पीकविमा मिळावा म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी देखील राज्य आणि केंद्र सरकारच्या फसव्या योजनांवर टीका केली.