गुणवत्तेमुळेच झाली वस्तीशाळेची प्राथमिक शाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 12:53 AM2019-05-26T00:53:22+5:302019-05-26T00:53:38+5:30
रेलगाव येथील भैरवनाथवाडी येथील वस्तीशाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व सर्वांगीण विकासामूळे या वास्ती शाळेचे रूपांतर प्राथमिक शाळेत झाले असून, येथील ग्रामस्थ व शिक्षकाने लोकसहभाग आणि स्ववर्गणीच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना शिक्षणासह, पोहण्यासाठी स्वीमिंग पुलाची व्यवस्था केली
फकिरा देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : तालुक्यातील रेलगाव येथील भैरवनाथवाडी येथील वस्तीशाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व सर्वांगीण विकासामूळे या वास्ती शाळेचे रूपांतर प्राथमिक शाळेत झाले असून, येथील ग्रामस्थ व शिक्षकाने लोकसहभाग आणि स्ववर्गणीच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना शिक्षणासह, पोहण्यासाठी स्वीमिंग पुलाची व्यवस्था केली आहे.
तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई या मुख्य बजार पेठेपासून ४ ते ५ किमी. अंतरावर असलेल्या रेलगाव शिवारातील भैरवनाथवाडी येथे ही शाळा असून, अत्यंत मुरमाड परिसरात ही वस्तीशाळा सुरू करण्यात आली होती. २०१६ पर्यंत या शाळेत केवळ १० विध्यार्थी होते, त्यानंतर या ठिकाणी डी. वाय. घनवट या वस्ती शाळा शिक्षकाची नेमणूक झाली व त्यांनी या परिसरातील प्रत्येक वस्तीवर जाऊन पालकांच्या भेटी घेतल्या व मुलांना या वस्ती शाळेत टाकले. त्याला यश आले, आज या शाळेत पहिली ते ५ वी पर्यन्त ३७ विद्यार्थी आहेत. त्यामध्ये १९ मुली व १८ मुलांचा समावेश आहे. त्यातील २१ मुले हे ३ री ते ५ वीच्या वर्गात शिक्षण घेत असून, हे सर्व २१ विद्यार्थी आज अस्सल इंग्रजी वाचतात आणि बोलतातही . शिवाय ३०० पर्यंतचे पाढेही खाडखाड म्हणतात. ही वस्तुस्थिती जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेची आहे. यावर कोणाला विश्वास बसणार नाही. मात्र, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आज या शाळेत प्रवेश घेण्यासाठी १५ पालकांनी संपर्क साधला असून ११ मुले प्रवेशपात्र ठरली आहेत, त्यामुळे येणाऱ्या शैक्षणिक वर्षांत या शाळेतील विध्यार्थी संख्या ही ७० पर्यंत पोहोचेल. या एका शिक्षकाने केलेल्या शैक्षणिक क्रांतीची दखल गावकऱ्यांसह जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी, अधिका-यांनी घेतली आहे. घनवट यांचा आदर्श इतर शिक्षकांनी घेण्याची गरजही व्यक्त होत आहे.
सर्वांचे सहकार्य
सतीश मिसाळ हे शाळेला लागेल तेव्हा चारचाकीगाडी तेही फक्त डिझेलचा खर्च ते घेतात. दिलीप मिसाळ यांनी शाळेला सर्व मुलांना संपूर्ण १ वर्षाकरिता वही पेनचा खर्च तेही आपल्याच शाळेचे छायाचित्र असलेले, तर राहुल सोनवने यांनी मुलांना पोहणे शिकण्यासाठी केलेल्या तलावात टाकण्यासाठी पन्नी दिली. ९००० रुपयांची ही पन्नी आहे. या सर्व शिक्षकांच्या सहकार्यामुळे शाळेचे दिवस पालटले आहेत.