केदारखेडा मंडळात पावसाची हुलकावणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:25 AM2019-07-01T00:25:53+5:302019-07-01T00:26:05+5:30
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा मंडळातील दहा गावांमध्ये पावसाने पाठ फिरविली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : भोकरदन तालुक्यातील केदारखेडा मंडळातील दहा गावांमध्ये पावसाने पाठ फिरविली आहे. पावसाअभावी धूळपेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांची पेरणी वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
भोकरदन तालुक्यातील पारध, पिंपळगाव रेणुकाई, धावडा, आन्वा, लेहा, जळगाव सपकाळ आदी परिसरात पावसाने कहर केला आहे. नदीला आलेला पुरामुळे ेशेतक-यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे याच तालुक्यातील केदारखेडा परिसरात तूरळक पाऊस वगळता अद्यापही मोठा पाऊस झालेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तालुक्यातच एकीकडे पावसाच्या कहरमुळे पेरणी वाया जाण्याची भीती आहे तर दुसरीकडे अद्यापही पेरणीलाच सुरुवात झाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता पसरली आहे. बुधवारपासून परिसरता ढगाळ वातावरण निर्माण होत आहे. मात्र, पाऊस पडत नसल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. आजूबाजूस सर्वत्र जोरदार पाऊस झाला असला तरी परिसरातील दहाहून अधिक गावांना पावसाने हुलकावणी दिली आहे.
परिसरात पाऊस झाला नसला तरी पूर्णा नदीला मात्र पाणी आले आहे. वरच्या भागात ब-यापैकी पाऊस झाल्याने पूर्णा नदी वाहू लागल्याने ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे. सुरुवातील परिसरात मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण तयार होत असल्याने शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले. मात्र, जोरदार पाऊसच नसल्याने शेतक-यांनी सध्या पेरणी थांबवली आहे. जोरदार पावसाच्या प्रतीक्षा लागली आहे.
पावसाच्या रिपरिपमुळे पारध परिसरात दुबार पेरणीचे संकट
लोकमत न्यूज नेटवर्क
पारध : भोकरदन तालुक्यातील पारधसह परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी साचले आहे. तर काही शेतक-यांनी केलेली धूळपेरणी वाया गेली आहे. त्यामुळे शेतक-यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
परिसरात २२ जून पासून कमी जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे परिसरातून वाहणारी रायघोळ नदी आठवड्यातून तब्बल पाच वेळेस दुथडी भरून वाहिली. नदीच्या पुरामुळे नदी काठच्या शेतक-यांची जमीन खरडून गेल्याने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. शनिवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास परिसरातील पारध खुर्द, शेलुद, पद्मावती आदी ठिकाणी जोरदार पाऊस झाला. हा पाऊस तब्बल अडीच तास धो -धो कोसळत होता. त्यामुळे अनेक शेतांमध्ये गुडघाभर पाणी शिरल्याने क्षणात होत्याचे नव्हते झाले. या परिसरात जवळपास साठ टक्के शेतक-यांनी आपल्या शेतात कपाशी, सोयाबीन, मका आणि मिरचीची लागवड केली आहे. बियाणे आणि खरावर शेतक-यांचे हजारो रुपये खर्च झाले आहेत. शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेकांची पेरणीच वाहून गेली आहे. शेतात पाणी साचल्याने लहान लहान कोंब नष्ट झाले. त्यामुळे इतके दिवस पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणा-या शेतक-यांना पाऊस वै-यासारखा वाटू लागला आहे. वाया गेलेल्या बी- बियाणांचा खर्च कसा करावा याची चिंता शेतक-यांना सतावत आहे. परिसरात झालेल्या नुकसानीचे प्रशासनाने पंचनामे करुन नुकसान ग्रस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी शेतक-यांनी केली.