एकेरी वाहतुकीमुळे कोंडी वाढतेय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:29 AM2018-01-11T00:29:07+5:302018-01-11T00:29:33+5:30
बस स्थानकासमोर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : येथील बस स्थानकासमोर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. तसेच पुलाचे काम सुरू असल्याने रस्त्याच्या दुतर्फा लोखंडी पत्र्याची संरक्षण भिंत उभारली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत असून, या भागात गतिरोधक बसविण्याची मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
जवळ येईपर्यंत बसस्थानकाचे प्रवेशद्वार दिसत नाही. त्यामुळे बसस्थानकात येणारी बस व विरूद्ध दिशेने येणारे कोणतेही वाहन स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ समोरा-समोर येतात.
दरम्यान जर ब्रेक लागला नाही तर अपघाताची भीती असते. चालकाला बस स्थानकात घेण्याची घाई असते. तर विरूद्ध दिशेने आलेल्या चालकाला वाहन पुढे नेण्याची गडबड असते. त्यामुळे दोघेही माघार घेत नाहीत. त्यामुळे वाहन मागे घेण्यावरून खाजगी वाहन चालक व बस चालकांत वाद होत आहेत. या प्रकारामुळे राष्ट्रीय महामार्गावर अनेक वेळा वाहतूक ठप्प होत आहे.
शहागड बसस्थानकासमोर व पेट्रोल पंपासमोर गतिरोधक बसविल्यास अपघात टळतील. तसेच वाहनांची कोंडीही होणार नाही, असे ग्रामस्थांसह व्यापारी बांधवांचे म्हणणे आहे.