अवकाळी पाऊस, वादळाचा फटका, कांद्याला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 01:13 AM2019-04-19T01:13:55+5:302019-04-19T01:14:22+5:30
घनसावंगी तालुक्यात कुंभार पिंपळगावसह परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यात कुंभार पिंपळगावसह परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कुंभार पिंपळगावसह शिवणगाव, उक्कडगाव, भादली, मूर्ती, नागोबाची वाडी आदी गावांमध्ये वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस झाला.
सध्या उन्हाळा कांदा काढणीचे व चाळीत भरण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली आहे. यावेळी हिरवी मिरची, टोमॅटो, हिरवा भाजीपाला इ. पिके बाधित झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता पसरली आहे.
अचानक आलेल्या या पावसाामुळे काही ठिकाणी कांदा तर काही ठिकाणी वीटभट्टीवर तयार केलेल्या विटा भिजल्या. तसेच सध्या स्थितीत अनेक ठिकाणी कांदा काढणीला आला होता.
मात्र या पावसाने त्याचेही मोठे नुकसान झाले असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली आहे.
पाच टन कांदा झाला खराब
शिवणगाव येथील शेतकरी काकासाहेब जनार्दन तौर यांनी गट क्र. ९४ मध्ये उसामध्ये आंतरपीक म्हणून कांद्याची लागवड केली होती. तो कांदा काढून पाथ कापणी चालू असताना मंगळवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे पाच टन कांदा खराब झाला आहे. यात त्यांचे जवळपास पन्नास हजार रूपयांचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.