सील केलेल्या मालमत्तेचा कर लवकर भरा, जालना नगरपालिका करतेय लिलावाची तयारी
By विजय मुंडे | Published: March 24, 2023 06:55 PM2023-03-24T18:55:15+5:302023-03-24T18:55:48+5:30
पीआरकार्डवर येणार पालिकेचे नाव : थकीत कर भरण्यासाठी आठ दिवसांची मुभा!
जालना : थकीत कराच्या वसुलीसाठी नगर पालिकेने शहरातील १०- २० नव्हे तब्बल ५०० मालमत्ताधारकांच्या मालमत्तांना सील करून टाळे ठोकले आहे. ३१ मार्च पर्यंत संबंधितांनी कराचा भरणा न केल्यास संबंधित मालमत्तांच्या पीआर कार्डवर पालिकेचे नाव लावणे किंवा लिलाव करून कराची वसुली करण्याची तयारी पालिका प्रशासन करीत आहे. त्यासाठी ३१ मार्च नंतर जिल्हाधिकाऱ्यांकडे रितसर प्रस्तावही दिला जाणार आहे.
जालना नगर पालिकेची शहरातील थकबाकीदारांकडे तब्बल १०० कोटी रूपयांचा कर थकीत आहे. थकीत कराची वसुली व्हावी, यासाठी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गत महिन्यापासून थेट कारवाई मोहीम हाती घेण्यात आली आहे. थकीत कर असणाऱ्या मालमत्ता धारकांना नगर पालिका प्रशासनाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. परंतु, या नोटिसांना अनेकांनी केराची टोपली दाखविली. त्यामुळे वरिष्ठांनी कराची वसुली सक्तीने करण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार कारवाईसाठी नियुक्त असलेल्या पथकांनी कर थकीत असलेल्या १० - २० नव्हे तब्बल ५०० मालमत्ताधारकांच्या मालमत्तांना कलम १५२ नुसार सील टोकले आहे. सील ठोकल्यानंतर संबंधितांना थकीत कराचा भरणा करण्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली आहे.
३१ मार्च पर्यंत कराचा भरणा करणाऱ्यांच्या मालमत्तांचे सील काढले जाणार आहे. परंतु, कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांच्या पीआर कार्डवर नगर पालिकेचे नाव लावणे किंवा मालमत्तांचा लिलाव करून कराची वसुली करण्याची मोहीम कलम १५६ नुसार राबविली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता आवश्यक असून, त्याबाबतचा प्रस्तावही ३१ मार्च नंतर नगर पालिका जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी होताच मालमत्तांचा लिलाव करणे किंवा पीआरकार्डवर पालिकेचे नाव लावण्याची कार्यवाही होणार असल्याचे पालिकेतील सूत्रांकडून सांगण्यात आले.
एका महिन्यात दोन कोटींची वसुली
नगर पालिकेच्या चार पथकांनी मालमत्ता सील करण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे. त्यामुळे शहरातील थकबाकीदारांनी एका महिन्यात २ कोटी ७० लाख रूपयांचा कर नगर पालिकेकडे भरला आहे. चालू आर्थिक वर्षात जवळपास १४ कोटी ३१ लाख रूपयांचा थकीत कर आजवर वसूल झाल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
वेळेवर कराचा भरणा करावा
अधिक कर थकीत असणाऱ्या मालमत्ताधारकांच्या मालमत्तांना पालिकेने सील ठोकले आहे. ३१ मार्च पूर्वी कराचा भरणार करणाऱ्यांच्या मालमत्तांचे सील काढले जाणार आहे. परंतु, मुदतीत कराचा भरणा न करणाऱ्या मालमत्ता धारकांवर कलम १५६ ची कारवाई करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला जाणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता मिळताच पुढील कारवाई होईल. कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी वेळेवर कराचा भरणा करावा.
- संतोष खांडेकर, मुख्याधिकारी, जालना