वाहनांवर चुकीचे नंबर टाकणारे दोघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2019 01:08 AM2019-08-15T01:08:02+5:302019-08-15T01:08:31+5:30
चुकीचे नंबर टाकून वाहने चालविणाऱ्या टोळीचा एडीएसच्या पथकाने पर्दाफाश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : चुकीचे नंबर टाकून वाहने चालविणाऱ्या टोळीचा एडीएसच्या पथकाने पर्दाफाश केला. ही कारवाई बुधवारी दुपारी शहरासह इतर ठिकाणी करण्यात आली. यावेळी १५ लाख ५५ हजार रूपये किमतीची सहा वाहने ताब्यात घेण्यात आली आहेत.
वाहनावरील खोट्या चेसीस नंबर टाकून कागदपत्रे नसताना वाहने चालविली जात असल्याची माहिती एडीएसचे पथकप्रमुख पोनि यशवंत जाधव यांना मिळाली होती. पोनि जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी दुपारी जालना शहरातील गरीबशहा बाजार भागात कारवाई करून शेख शकील शेख अहेमद (रा. अंबड), शेख मोबीन शेख मतीन (रा.जालना) या दोघांना ताब्यात घेतले. शेख शकील हा शेख मोबीन याच्या मदतीने वाहनांवर चुकीचे नंबर टाकत
होता.
मागील पाच-सहा महिन्यांत वाहनांवर खोटे नंबर टाकल्याची माहिती संबंधितांनी पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी आष्टी, परतूर, अंबड या भागात कारवाई करून १५ लाख ५५ हजार रूपये किमतीची सहा वाहने ताब्यात घेतली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि यशवंत जाधव, सपोनि बी.डी. बोरसे, सपोउपनि एम.बी.स्कॉट, पोहेकॉ रामप्रसाद, रंगे, पोना सुभाष पवार, नंदकिशोर कामे, संदीप चिंचोले, राजू पवार, सचिन आर्य, श्रीकुमार आडेप, धनाजी कावळे, विजय निकाळजे आदींनी केली.
तीन ठिकाणांहून वाहने ताब्यात
पोलिसांनी आष्टी येथील युसूफ समद बागवान यांचे वाहन (क्र.एम.एच.१२- ए.एफ.७९६६, तारेख सुभान शेख यांचे वाहन (क्र.एम.एच.१२- पी.ए. ०७१३), महंमद फारूख गुलाम दस्तगीर बरेखाने यांचे वाहन (क्र.एम.एच.२४- एफ.०९९३), परतूर तालुक्यातील शिंगोणा येथील दिनकर पुंजाजी घुगे यांचे वाहन (क्र.एम.एच.२१- ३६६५).
घनसावंगी तालुक्यातील निपाणी पिंपळगाव येथील नारायण निवृत्ती मिठे यांचे वाहन (क्र.एम.एच.१६-ई. ३४६१ व तीर्थपुरी येथील गणेश दगडू भोसले यांचे वाहन (क्र.एम.एच.१२- ४२९१) कारवाई करून ताब्यात घेतले.