५ वर्षात जिल्ह्यातील ६६७ रुग्ण झाले कुष्ठरोगमुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 12:10 AM2019-06-09T00:10:22+5:302019-06-09T00:10:54+5:30
मागील पाच वर्षात जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगापासून मुक्त करण्यात आले आहे.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात कुष्ठरोग रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. या रुग्णांना कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रयत्नांनाही यश येताना दिसत आहे. कारण मागील पाच वर्षात जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगापासून मुक्त करण्यात आले आहे.
दरवर्षी जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरात कुष्ठरोग शोधमोहीम राबविण्यात येते. त्यानुसार संशयित रुग्णांची तपासणी करण्यात येते. कुष्ठरोग निर्मूलनाकरिता सुरू केलेली शोधमोहीम, सर्वेक्षण आणि कुष्ठरुग्णांवर होणारा नियमित उपचार व जनजागृतीमुळे जिल्ह्यात दरवर्षी अनेकजण कुष्ठरोगाच्या तावडीतून मुक्त होत आहेत.
कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभाग पूर्णपणे प्रयत्न करीत आहे. कुष्ठरुग्णांवर योग्य उपचार करण्यात येतात. या प्रयत्नामुळे मागील सहा वर्षांत जिल्हा आरोग्य विभागाने ६६७ रुग्णांना कुष्ठरोगमुक्त केले आहे. यात २०१४-१५ मध्ये १३६, २०१५-१६ मध्ये ११५, २०१६-१७ मध्ये १२८, २०१७-१८ मध्ये ११७, २०१८-१९ मध्ये १४१ रुग्णांना कुष्ठरोगमुक्त करण्यात आले आहे.
यावर्षी देखील जिल्ह्यात कुष्ठरोग शोधमोहीम मे महिन्यात राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाभरातील ७१२ गावामधील ३ लाख २२ हजार ३६२ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यावेळी नागरिकांच्या घरोघरी जाऊन तपासणी केली गेली. आरोग्य सेवकांद्वारे ही मोहीम राबविण्यात आली.
यात ३२३ संशयित रूग्ण आढळून आले. या सर्व संशयित रूग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली आहे. त्यातील ४ जणांना कुष्ठरोग असल्याचे निष्पन्न झाले.
जनजागृतीवर भर
कुष्ठरोग निर्मूलनाकरिता शासनाच्या आरोग्य विभागाद्वारा जनजागृतीवर जास्त भर दिला जात आहे. नागरिक जागरुक झाले आहेत. लोक स्वत: दवाखान्यात येऊन कुष्ठरोगाचे उपचार करताना दिसतात. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर नि:शुल्क तपासणी केली जात असून याचा लाभ घेण्याचे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.
आजार नियंत्रणात
कुष्ठरोगावर नियमितपणे औषधोपचाराने आजार नियंत्रणात आणला जाऊ शकतो. मागील पाच वर्र्षांत कुष्ठरोगाचे प्रमाण कमी झाले आहे. सहा ते बारा महिन्यांच्या उपचारानंतर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होतो. शरीरावर पाच किंवा यापेक्षा कमी चट्ट्याचे व्रण असल्यास सहा महिन्यांचा उपचार दिला जातो तर यापेक्षा अधिक चट्टे असल्यास एक वर्ष औषधोपचार करणे अनिवार्य आहे.