आचारसंहितेच्या कालावधीत १०८ जणांवर गुन्हे, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:46 AM2019-04-22T00:46:06+5:302019-04-22T00:46:26+5:30
आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १०८ दारुड्यांवर गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये ६२ वार, ४६ बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर ६३ आरोपींना अटक करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने १०८ दारुड्यांवर गुन्हे दाखल केले आहे. यामध्ये ६२ वार, ४६ बेवारस गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर ६३ आरोपींना अटक करण्यात आली.
२३ एप्रिल रोजी जालना लोकसभा मतदार संघाची निवडणूक होत आहे. यासाठी जवळपास महिनाभरापूर्वीपासूनच जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली होती. आचार संहितेमध्ये दारुची वाहतूक करण्यास बंदी असते. आचारसंहितेच्या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम राबवत जिल्हाभरातील १०८ जणांवर कारवाई केली आहे.
यात ६२ वारस, ४६ बेवारस गुन्ह्यांची नोंद करण्यात असून, ६३ आरोपींना अटक करण्यात आली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ७४२ लि. गावठी दारू, १३०१८ लि. गूळमिश्रित रसायन, ४१५.८६ लि. देशी दारु, १०० लि. विदेशी दारु, २४. ३० लि. परराज्यातील विदेशी दारु, २३.४ लि. बीअर आणि एकूण १४ वाहनांचा समावेश असून, १४ लाख २४ हजार ९२५ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तीन दिवसांत तीन कारवाया
राज्य उत्पादन शुल्क विभागाने १८ ते २० एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील तीन ठिकाणी कारवाया केल्या आहेत. यात भोकरदन येथे बेकायदेशीररीत्या देशी दारुची वाहतूक करताना एका दुचाकी चालकाला पकडण्यात आले. त्याच्याकडून ३८ हजार ९९२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर अंबड व जालना शहरात ३ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये गावठी, देशी दारु तसेच १ दुचाकी जप्त करण्यात आली. असा एकूण ४० हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर तिसरी कारवाई घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी येथील एका हॉटेलवर छापा मारुन ६० हजार ०५६ रुपयांची दारु जप्त करण्यात आली.