दुष्काळात खचून न जाता शेळीपालनातून साधली आर्थिक प्रगती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 12:24 PM2019-01-05T12:24:29+5:302019-01-05T12:25:31+5:30
यशकथा : हा व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसून कर्जही काढले नसल्याचे त्यांनी सांगितले.
- फकिरा देशमुख ( जालना )
दुष्काळी परिस्थितीमध्ये खचून न जाता, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या तीन- चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत असे असतानाही गोकुळ, ता. भोकरदन येथील शेतकरी उत्तम बंडू पालोदे यांनी शेतीपूरक असलेल्या शेळीपालनाच्या व्यवसायातून चांगली आर्थिक उन्नती साधली आहे.
केळना या छोट्याशा नदीच्या काठावर गोकुळ हे गाव वसलेले आहे. मराठवाड्यात पडलेल्या दुष्काळाला भोकरदन तालुकाही अपवाद राहिलेला नाही. तालुक्यातील शेतकरी सततच्या नापिकीमुळे हैराण झाले आहेत. शेतीचा व्यवसाय तोट्यात जात असल्याने आता काय करावे असा प्रश्न येथील शेतकऱ्यांसमोर आहे. सततच्या या संकटातून बाहेर पडण्यासाठी येथील शेतकरी उत्तम पालोदे यांनी शेतीपूरक व्यवसाय करण्याचा निश्चय केला. त्यांच्याकडे दहा एकर शेतजमीन आहे. परंतु कोणता शेतीपूरक व्यवसाय परवडेल याबाबत त्यांच्या मनात संभ्रम होता. यातच त्यांच्या शेजारच्या गावातील शेतकरी विनोद गावंडे यांनी शेळीपालन हा व्यवसाय फायदेशीर असल्याचे सांगून मीसुद्धा तो करण्याचा निश्चय केल्याचे सांगितले. यानंतर उत्तम पालोदे यांनीही शेळीपालन करण्याचे ठरविले.
मात्र, तांत्रिकदृष्ट्या शेळीपालन कसे करावे याबाबत त्यांना माहिती नव्हते, त्यामुळे मनात अनेक शंका-कुशंका होत्या. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित धुमाळ, डॉ. गायकवाड यांनी हा व्यवसाय कसा करावा, याचे मार्गदर्शन केले. उत्तम पालोदे यांनी नंतर पडेगाव (औरंगाबाद) येथून सुरुवातीला ६० ते ७० हजार रुपये खर्च करून १० उस्मानाबादी शेळ्या खरेदी केल्या. त्यासाठी ८०० स्क्वेअर फुटांचे टीनच्या पत्र्यांचे शेड तयार करून तीन वर्षांपूर्वी हा व्यवसाय सुरू केला. उत्तम नियोजन व व्यवस्थापनाने पालोदे यांचा हा व्यवसाय फायद्यात पडला असून, दरवर्षी त्यांना खर्च वजा जाता दोन लाखांपर्यंत निव्वळ नफा राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे बोकड किवा शेळी विक्रीसाठी कोणत्याही बाजारात जावे लागत नाही. व्यापारी घरपोच बोकड खरेदी करण्यासाठी गावात येतात, असे उत्तम पालोदे यांनी सांगितले. हा व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसून कर्जही काढले नसल्याचे त्यांनी सांगितले. खर्चाची तरतूद नसेल तर, कमी शेळ्यांवर व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला उत्तम पालोदे देतात. शेळ्यांना खाद्य म्हणून ते शेतात हिरवा घास नियमित टाकतात. तसेच मक्याच्या कडवळीचाही उपयोग खाद्य म्हणून करतात. जनावरांच्या आजाराबाबत ते सजग असून, चाहूल लागताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो किंवा उपचार केले जातात. आज पालोदे यांच्याकडे ४० लहान मोठ्या शेळ्या असून अनेक बोकड विक्री केले आहेत. व्यापाऱ्यांना विक्री करताना आपण बोकडाचे वजन करूनच विक्री करीत असल्यामुळे इतरांपेक्षा आपणास जास्त पैसे मिळतात, असे पालोदे यांनी सांगितले़