मनोज जरांगेंची ईडी चौकशी करा; ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 03:08 PM2024-06-24T15:08:50+5:302024-06-24T15:10:08+5:30
दहा दिवसांच्या उपोषणानंतर ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर जालना शहरातील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत.
जालना: मनोज जरांगे यांचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत होते. मुख्यमंत्र्यांची रसद आणि पाठिंबा त्यांच्या पाठीशी होता. गद्दारीचा ठसा पुसण्यासाठी मराठा समाज पाठीशी उभा करून मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून प्रयत्न केले. यामुळे मनोज जरांगे यांची ईडीमार्फत चौकशी करून कारवाई करणे आवश्यक असल्याची मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली. रविवारी खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना ओबीसी नेते वाघमारे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दहा दिवसांच्या उपोषणानंतर ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यावर जालना शहरातील एका खासगी इस्पितळात उपचार सुरू आहेत. १० दिवसांच्या उपोषणामुळे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना उलट्यांचा त्रास जाणवत आहे. यासोबतच लक्ष्मण हाके यांचा बीपीदेखील वाढलेला आहे. दोघांच्या जठरावर सूज असल्याने त्यांना लिक्वीड अन्नदेखील पचत नसल्याचे दिसत आहे. यामुळे त्यांना उलट्यांचा त्रास होत आहे. लक्ष्मण हाके यांना बीपीची गोळी दिली असून, अद्याप रक्तदाब नियंत्रणात आला नसून, उपचार सुरू असल्याचे डॉ. सुहास विघ्ने यांनी सांगितले.
दरम्यान, आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनात कोणाकडून पैसा आला होता, याची सरकारने ईडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली. तसेच येत्या अधिवेशनात ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यावर सरकारने निर्णय घेतला नाही, तर पुन्हा आंदोलनाला बसू, असा इशारा नवनाथ वाघमारे यांनी दिला आहे.