शासकीय योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- दानवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:32 AM2021-01-23T04:32:09+5:302021-01-23T04:32:09+5:30
जालना : सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनामार्फत अनेक योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतात. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ ...
जालना : सर्वसामान्यांच्या उन्नतीसाठी केंद्र शासनामार्फत अनेक योजना प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबविण्यात येतात. शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी अधिकाऱ्यांनी योजनांची प्रभावीपणे व गतीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री तथा दिशा समितीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिले.
जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीचे आयोजन जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक कल्पना क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
यावेळी राज्यमंत्री दानवे म्हणाले, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय रुर्बन योजनेंतर्गत परतूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मिनी एमआयडीसी प्रकल्प राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असून, हा प्रकल्प राबविण्यासाठी काही अडचणी असतील तर त्या केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करून सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून अनेक विकासकामांसाठी निधी मिळण्याबरोबरच मजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून देण्यात येते. एमआरईजीएसच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कुशल व अकुशल कामांचा ६०:४० चे परिमाण मेन्टेन राहील, त्याचबरोबर योजनेचा निधी परत जाणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी दानवे यांनी योजनांचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीस समितीच्या सर्व अशासकीय सदस्यांसह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.