सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा सरकाचा प्रयत्न: अजित पवार यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 09:21 PM2017-09-17T21:21:07+5:302017-09-17T21:33:07+5:30
विद्यमान सरकारचे धोरण शेतकरी व सहकार विरोधी असून, सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली.
जालना : विद्यमान सरकारचे धोरण शेतकरी व सहकार विरोधी असून, सहकार क्षेत्र मोडीत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. येथे शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
पवार म्हणाले, की सहकार क्षेत्रात चांगले काम करणाºया संस्थांनी दीर्घकाळ परिश्रम घेऊन सहकार चळवळीला बळ देण्याचे काम केले आहे. मात्र, लहान-मोठ्या सहकारी व नागरी बँकांचे मोठ्या बँकांमध्ये विलिनीकरण करून सहकार चळवळ संपविण्याचा सरकारचा डाव आहे. जीएसटीमुळे महाराष्ट्राच्या तिजोरीवर मोठा ताण पडला असून, कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. महागाई प्रचंड वाढली असून, पेट्रोल, गॅस दरवाढीतून सर्वसामान्यांची लूट सुरू आहे. असे असताना सरकार बुलेट ट्रेनचे स्वप्न पाहत आहे. बुलेट ट्रेनऐवजी सरकारने आहे, ते रेल्वेरुळ ठीक करून अपघात घडणार नाही याची काळजी घ्यावी. सत्तेत असणाºया शिवसेनेने सरकारला जनहिताचे निर्णय घेण्यास भाग पाडण्याऐवजी तेच रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. त्यामुळे शिवसेना सत्तेत आहे की विरोधात हेच कळत नाही, अशी टीका त्यांनी केली. पुरोगामी विचारांच्या लोक, पत्रकार यांचे खून होत असताना तपास लागत नाही, यास जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मुंबई विद्यापीठ निकाल म्हणजे तारीख पे तारीख
राज्याच्या शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कार्यपद्धतीवर अजित पवार यांनी टीकास्त्र सोडले. शिक्षण विभाग रोज नवे फतवे काढत आहे. एकीकडे क्रीडा शिक्षकांची भरती बंद असताना दुसरीकडे एकाच दिवसात दहा लाख मुलांचे फुटबॉल सामने घेतले जात आहेत. मुंबई विद्यापीठाचा निकाल म्हणजे तारीख पे तारीख, सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पवार म्हणाले.