बारा बलुतेदार विकास महामंडळासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:30 AM2021-07-31T04:30:05+5:302021-07-31T04:30:05+5:30
जालना : राज्यातील बारा बलुतेदारांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासह ते तातडीने कार्यान्वित ...
जालना : राज्यातील बारा बलुतेदारांचा आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यासह ते तातडीने कार्यान्वित होण्यासाठी शासनाच्या स्तरावर पुढाकार घेणार असल्याची ग्वाही राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघाचे अध्यक्ष कल्याण दळे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष राजेंद्र राख, शहराध्यक्ष शेख महेमूद, उपाध्यक्ष राम सावंत, तालुकाध्यक्ष वसंत जाधव, अॅड. संजय काळबांडे, डॉ. विशाल धानुरे आदींच्या शिष्टमंडळाने टोपे यांची गुरुवारी मुंबई येथे भेट घेऊन राज्यातील बारा बलुतेदारांचे प्रश्न व समस्या मांडल्या. महासंघाचे अध्यक्ष दळे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ प्रस्तावित केले असले तरी अद्याप हे महामंडळ स्थापन करण्यात आलेले नाही. दोन वर्षांपासून कोरोनामुळे राज्याचे बारा बलुतेदारांचे व्यवसाय पूर्णपणे बंद होते. व्यवसाय बंद असल्यामुळे बारा बलुतेदार हा पूर्णपणे आर्थिक संकटात सापडला असून, निकषात बसत नसल्यामुळे कोणत्याही बँका कर्ज देण्यासाठी तयार होत नाहीत. त्यामुळे राज्यातील बारा बलुतेदारांना शासनाकडून आर्थिक मदत होणे गरजेचे असून, बारा बलुतेदार आर्थिक विकास महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याची मागणीही दळे यांनी केली. या वेळी टोपे यांनीही या मागण्यांबाबत सकारात्मक पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.