राजुरात शेतकऱ्याचा विषप्राशनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:04 AM2018-05-17T01:04:14+5:302018-05-17T01:04:14+5:30
अनेकवेळा मागणी करूनही नवीन रोहित्रावरून कृषीपंपासाठी समांतर वीज जोडणी करून देत नसल्याने त्रस्त झालेल्या पिंपळगांव थोटे येथील शेतक-याने राजूरच्या वीज उपकेंद्रात विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : अनेकवेळा मागणी करूनही नवीन रोहित्रावरून कृषीपंपासाठी समांतर वीज जोडणी करून देत नसल्याने त्रस्त झालेल्या पिंपळगांव थोटे येथील शेतक-याने राजूरच्या वीज उपकेंद्रात विषप्राशन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. या अचानक उद्भवलेल्या प्रकारामुळे उपकेंद्रात मोठा गोंधळ उडाला होता.
याविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून पिंपळगाव थोटे येथील गट क्रमांक १५९ मध्ये ईन्फ्रा योजनेअंतर्गत नवीन रोहित्र बसवण्यात आलेले आहे. सदर रोहित्रावरून समांतर वीज जोडणी देण्याची मागणी शेतकरी सचिन थोटे, नारायण थोटे, रवींद्र थोटे, विनायक साळवे, भीमराव गायकवाड यांनी अनेक वेळा राजूर उपकेंद्रातील सहायक अभियंत्याकडे केली. मात्र, संबधित अधिकारी शेतक-यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्याने शेतक-यांना कमी दाबाचा वीजपुरवठा होत असल्याने अडचणी निर्माण होत आहे. शेतकºयांनी यापूर्वी अनेकवेळा महावितरणच्या अधिका-याकडे मागणी केली तसेच १७ मार्च २०१८ रोजी राजूर उपकेंद्रासमोर उपोषण केले होते. त्यावेळी संबंधित अधिका-यांनी नवीन रोहित्रावरून वीज जोडणी करून देण्याचे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले होते. परंतू दोन महिने झाले तरी वीज जोडणी करून मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या सचिन थोटे या शेतकºयाने बुधवारी दुपारी साडेचार वाजता राजूर उपकेंद्रात येऊन वीज जोडणीचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करून खिशातून विषारी द्रवाची बाटली काढून तोंंडाला लावण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळच्या शेतकरी व कर्मचा-यांनी वेळीच त्यांच्याकडे धाव घेऊन त्यांना रोखले तसेच पोलिसांना पाचारण करण्यात आले. या प्रकारामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.