आई-वडिलांचा आधार गेला! आयशरची दोन दुचाकींना धडक; एक ठार
By दिपक ढोले | Published: October 4, 2023 10:30 PM2023-10-04T22:30:04+5:302023-10-04T22:31:34+5:30
दोघे गंभीर जखमी
भोकरदन: भरधाव आयशरने दोन दुचाकींना धडक दिल्याची घटना भोकरदन- जालना रोडवरील सोयगाव देवी पाटीजवळ बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. यात एक तरुण ठार झाला आहे, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. सागर दिंगाबर राऊत (२५, रा. भोकरदन) असे मयताचे नाव आहे. ज्ञानेश्वर शहाजी सहाणे (२८), ज्ञानेश्वर धोंडीराम रोडे (२५, रा. छत्रपती संभाजीनगर) हे दोघे जण गंभीर जखमी आहेत.
बुधवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास सागर दिंगाबर राऊत (२५, रा. भोकरदन) हा तरुण दुचाकीने जालना येथून भोकरदनकडे जात होता. ज्ञानेश्वर शहाजी सहाणे (२८, रा. सोयगाव देवी) हा सुद्धा दुचाकीने जालन्याहून भोकरदनकडे जात होता. त्याचवेळी ज्ञानेश्वर धोंडीराम रोडे (२५, रा. छत्रपती संभाजीनगर) हे आयशर घेऊन भोकरदनहून जालन्याकडे जात होते.
सोयगाव देवी पाटीजवळ आयशरने दोन्ही दुचाकींना धडक दिली. एक दुचाकी तीन किलोमीटरपर्यंत आयशरने फरफरट नेली. या अपघातात आयशर चालकासह तीन जण गंभीर जखमी होते. या जखमींना पोलिस उपनिरीक्षक युवराज पाडळे व पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविले असता, उपचार सुरू असताना सायंकाळी सागर राऊत या तरुणाचा मृत्यू झाला आहे, तर अन्य दोघे जण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
आई-वडिलांचा आधार गेला
सागर हा दिगंबर राऊत यांना एकुलता एक मुलगा होता. अपघातात त्याचा मृत्यू झाल्यामुळे आई-वडिलांचा आधार गेला आहे. त्याच्या अपघातामुळे भोकरदन शहरावर शोककळा पसरली आहे.