तुरीचे आठ कोटी रुपये थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:11 AM2018-03-27T01:11:35+5:302018-03-27T01:11:35+5:30
शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी केलेल्या तुरीचे तब्बल आठ कोटी रूपये अद्यापही नाफेडकडून मिळाले नाही. तुरीची थकीत रक्कम कधी मिळणार अशी विचारणा शेतक-यांतून होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शेतकऱ्यांकडून हमी भावाने खरेदी केलेल्या तुरीचे तब्बल आठ कोटी रूपये अद्यापही नाफेडकडून मिळाले नाही. तुरीची थकीत रक्कम कधी मिळणार अशी विचारणा शेतक-यांतून होत आहे.
जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रांवर २६ मार्च पर्यंत १५ हजार ५४८ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. हमीभावाने तूर खरेदी केल्यानंतर आवठड्यानंतर शेतक-यांच्या बँक खात्यात तुरीची रक्कम जमा करण्यात येईल,अशी नाफेडकडून सांगण्यात आले होते. मात्र दोन महिने व्हायला आले, तरी अद्यापही जिल्ह्यातील १७७७ शेतक-यांचे ८ कोटी ४७ लाख ३६ हजार ६०० रूपये एवढी रक्कम अद्यापही नाफेड कडून मिळाली नाही. परिणामी शेतकरी सुध्दा हैराण झाले आहेत. अनेक शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारून तुरीच्या रकमेबाबत विचारण करीत आहेत. जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी उशिराने सुरू करण्यात आली. परिणामी बहुतांश शेतक-यांना कमी दरात तूर विकावी लागली.
नाफेडने ५४५० हमीभाव जाहीर करूनही तूर खरेदी केंद्र दीड महिना उशिराने सुरू केल्याचा फटका शेतक-यांना सहन करावा लागला. असे असतानाही जिल्ह्यातील सातहजार शेतक-यांनी हमीभावाने तूर विक्रीसाठी नोंदणी केली आहे. मात्र दोन महिने उलटूनही आत्तापर्यंत १७७७ शेतक-यांची तूर खरेदी करण्यात आली आहे. त्यातच खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने काही काळ तूर खरेदी ठप्प झाली होती. यावर तोडगा काढून खरेदी तात्पुरती सुरळीत करण्यात आली, मात्र तूर ठेवण्यासाठी पुरेशी जागाच नसल्याने जिल्ह्यात तूर खरेदी संथ गतीने सुरू आहे. यामुळे आॅनलाईन नोंदणी केलेल्या तब्बल ५ हजार २२३ शेतक-यांना तूर खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत.
अहवाल नाफेडकडे
जिल्ह्यात हमीभावाने १७७७ शेतक-याकडून खरेदी केलेल्या तुरीची रकमेचा अहवाल नाफेडच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. याबाबात नियमित पाठपुरावा सुध्दा घेण्यात येत आहे. मात्र अद्यापही नाफेडकडून काहीच प्रतिसाद मिळाले नाही.
- गजानन मगरे, जिल्हा पणन अधिकारी जालना