दोन हजार कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:41 AM2019-03-25T00:41:01+5:302019-03-25T00:41:33+5:30
भोकरदन मतदार संघांतील तब्बल दोन हजार ४६ कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात शनिवारी आणि रविवारी प्रशिक्षण देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन मतदार संघांतील तब्बल दोन हजार ४६ कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणुकीसंदर्भात शनिवारी आणि रविवारी प्रशिक्षण देण्यात आले. दोन दिवसात झालेल्या प्रशिक्षणासाठी गैरहजर राहिलेल्या २९ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा देण्यात आल्या आहेत.
या प्रशिक्षणा दरम्यान जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी रविवारी दुपारी प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणाचा आढावा घेऊन, प्रशिक्षणार्थींना मतदान यंत्राची हाताळणी कशी करावी, या बद्दल प्रात्यक्षिक स्वरूपात माहिती दिली. तत्पूर्वी त्यांनी स्ट्राँगरूमला भेट देऊन पाहणी केली.
२३ एप्रिलला जालना लोकसभा मतदार संघाचे मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशिनचा पहिल्यांदा समावेश केला आहे. यामुळे याची माहिती कर्मचा-यांना देण्यात आली. व मतदानाच्या वेळी सर्वांनी सतर्क राहून आपले कार्य चोख बजावण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी प्रशिक्षणार्थींना दिले.
दोन दिवस शनिवार व रविवार चार टप्प्यात सकाळी दहा ते दोन व दुपारी दोन ते सहा या वेळी उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष गोरड तहसीलदार जे. डी. वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात आले.
मतदानाच्या एक दिवस अगोदर निवडणूक साहित्य ताब्यात घेणे, मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान आणि मतदान संपल्यावर करावयाची कामे या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली.
दाम्पत्याची ‘तडजोड’
भोकरदन शहरात निवडणूक प्रशिक्षण सुरु असताना शिक्षिका एम. बी. फोले या प्रक्षिशणात असताना त्यांचे पती आर. के. खोकले हे आपल्या आठ महिन्याच्या मुलाचा सांभाळ करीत मंडपा बाहेर होते. त्यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, पहिल्या सत्रात माझे प्रशिक्षण झाले. तेव्हा ती मुलासोबत होती. आता तिचे प्रशिक्षण सुरु आहे. त्यामुळे मी मुलाचा सांभाळ करीत आहे.
बदनापुरात निवडणूक अधिका-यांना प्रशिक्षण
बदनापूर : बदनापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात व सभागृहात सहनिवडणूक निर्णय अधिकारी गणेश नि-हाळी, तहसीलदार छाया पवार यांच्या उपस्थित पार पडला. या प्रशिक्षण सत्रात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी भेट देऊन उपस्थित मतदान अधिका-यांना मार्गदर्शन केले.
लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रशासनाने तयारी सुरू केली असून, बदनापूर- अंबड विधानसभा क्षेत्रातील मतदान अधिकारी- कर्मचा-यांचे प्रशिक्षण येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात शनिवार व रविवार दोन सत्रात पार पडले. शनिवारी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी क्रमांक एकचे प्रशिक्षण झाले. तर रविवारी मतदान अधिकारी दोन व तीन यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात सहा.निवडणूक निर्णय अधिकारी गणेश नि-हाळी व सहाय्यक सहनिवडणूक निर्णय अधिकारी छाया पवार यांनी मार्गदर्शन करून मतदान अधिका-यांना प्रशिक्षित केले. यावेळी एलईडी संचावर पीपीटीच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षणास गैरहजर कर्मचा-यांना नोटीस बजावली आहे.
परतुरात दुस-या दिवशी प्रशिक्षण
परतूर : परभणी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सलग दुस-या दिवशी अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात २ हजार ५४ कर्मचा-यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे.
परभणी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात येत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकारी, कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. येथील जवाहर नवोदय विद्यालयात आयोजित प्रशिक्षणात शनिवार व रविवार या दोन दिवसांत दोन हजार ५४ अधिकारी, कर्मचा-यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीन प्रत्यक्ष हाताळण्याचा अनुभव या प्रशिक्षणात कर्मचा-यांनी घेतला. यावेळी निवडणुकीतील विविध जबाबदा-या पार पाडण्यासाठी १७ कक्षांची स्थापना करण्यात आली. या प्रशिक्षणात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी नायब तहसीलदार विजय दावणगावकर, सुरेखा कोटूरकर, पी. पी. निकाळजे, धनश्री भालचीम, संजय कास्तोडे, भगवान चव्हाण, अनिल शिंगाडे, परांडे, दंतेवाड आदींची उपस्थिती होती.