दोन हजार जणांना निवडणुकीचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2019 12:45 AM2019-09-30T00:45:47+5:302019-09-30T00:46:33+5:30
शनिवार व रविवार या दोनदिवसीय प्रशिक्षणात जालना तालुक्यातील १९९७ निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आगामी विधानसभेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. शनिवार व रविवार या दोनदिवसीय प्रशिक्षणात जालना तालुक्यातील १९९७ निवडणूक कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षण शहरातील सेंट मेरी हायस्कूल येथे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले.
या दोन दिवसीय प्रशिक्षणात तालुक्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यात मतदान प्रक्रियेतील बारीक- सारीक गोष्टी समजून सांगण्यात आल्या. यामुळे प्रशिक्षणार्थिंचे मनोबल वाढल्याचे दिसून आले.
२१ आॅक्टोबरला जालना विधानसभेसाठी मतदान होत आहे. या अनुषंगाने तालुक्यातील शासकीय व निमशासकीय कर्मचा-यांना हे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणात नाममात्र गैरहजर राहिलेल्या कर्मचा-यांना नोटिसा देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
प्रशिक्षणात उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर यांनी मतदानाच्या कामाची माहिती दिली. मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष मतदानापूर्वी कोणती तयारी करायची, प्रत्यक्ष मतदान आणि मतदान झाल्यानंतर कोमती कामे करावीत, याची माहिती देवून कंट्रोल युनिट, बायलेट युनिट, व्ही- व्हीव्हीपॅट या यंत्रांची काळजीपूर्वक हाताळणी जोडणी व बंद करताना घ्यावयाची काळजी इ. बाबींचे महत्व उपस्थिती निवडणूक कर्मचा-यांना समजून सांगितले. तसेच कर्मचाºयांना दिलेल्या जबाबदारीत कोणताही कसूर करू नये, असेही त्यांनी सांगितले. दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनाने विशेष आयकॉन यंत्रणेची व्यवस्था केली आहे. त्यांच्या गरजा ओळखून कशी मदत करावी, याविषयी निकेश मदारे यांनी माहिती दिली.
याप्रसंगी तहसीलदार श्रीकांत भुजबळ, गणेश पोलास, देवीदास गाडेकर, तालुका कृषी अधिकारी ए. टी. सुखदेवे, दिनकर पालवे यांच्यासह क्षेत्रीय अधिकारी, महसूल विभागाचे कर्मचारी, मंडळ अधिकारी व शासकीय- निमशासकीय कर्मचा-यांची उपस्थिती होती.