‘वाणाचे ताट’ सोडून महिलांच्या हाती निवडणूक ‘मतदान यंत्र’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:35 AM2021-01-16T04:35:42+5:302021-01-16T04:35:42+5:30
परतूर : महिलांसाठी मकरसंक्रांत हा सण महत्त्वाचा असतो; परंतु ऐन संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरच ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया आली आहे. त्यामुळे गत ...
परतूर : महिलांसाठी मकरसंक्रांत हा सण महत्त्वाचा असतो; परंतु ऐन संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरच ग्रामपंचायतीची मतदान प्रक्रिया आली आहे. त्यामुळे गत दोन दिवसांपासून वाणाचे ताट सोडून या महिलांनी निवडणूक मतदान यंत्र हाती घेतले आहे. सणापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देत या महिला गत दोन दिवसांपासून निवडणूक कामासाठी धावपळ करीत आहेत.
ग्रामपंचायत निवडणुका शांततेत आणि सुरळीत पार पडाव्यात यासाठी निवडणूक विभागाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यंदा ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदान प्रक्रिया ही मकरसंक्रांतीच्या काळातच आली आहे. त्यामुळे अनेक महिलांना हा सण साजरा करता आला नाही. मकरसंक्रांतीनिमित्त एकमेकींना वाण देणे, हळदी- कुंकू लावणे, मंदिरात एकत्रित जमणे, विविध धार्मिक विधी पार पाडणे, आदींना मात्र या महिलांना मुकावे लागले आहे. जवाहर नवोदय विद्यालयात शेवटचे प्रशिक्षण घेऊन शुक्रवारी साहित्य ताब्यात घेण्यासाठी या महिलांची धावपळ दिसून आली, तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी तालुक्यातील निवडणूक विभागाच्या कामावर असलेल्या महिला अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करीत असल्याचे दिसून आले. यंदा सणाऐवजी कर्तव्य पार पाडण्यावर या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भर दिल्याचे दिसून आले. असे असले तरी त्यांना महत्त्वाच्या मकरसंक्रांत सणाला मुकावे लागले.