वीजप्रश्नी शेतकरी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 01:05 AM2020-01-15T01:05:59+5:302020-01-15T01:06:33+5:30
खंडित वीजपुरवठ्याच्या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या सिपोरा अंभोरा परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी तहसील कार्यालासमोर ठिय्या मांडला
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : खंडित वीजपुरवठ्याच्या प्रश्नामुळे संतप्त झालेल्या सिपोरा अंभोरा परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी तहसील कार्यालासमोर ठिय्या मांडला. आंदोलक शेतकऱ्यांनी नायब तहसीलदार केशव डकले यांना घेराव घालून विविध प्रश्नांचा भडिमार करीत मागण्यांचे निवेदन दिले.
सिपोरा अंभोरा येथील फिडरवर देऊळझरी गावाच्या विजेचा भार जोडावा म्हणून मागील पाच-सहा दिवसांपासून मंगरुळ, डोलखेडा, रुपखेडा येथील शेतक-यांमध्ये वाद सुरु आहे. अगोदरच त्या फिडरवर भार जास्तीचा असल्याने इतर गावांचा भार घेतल्याने कोणत्याच गावांना वीजपुरवठा सुरळीत होणार नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी गेले शेतकरी किशोर अंभोरे व इतरांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
सिपोरा अंभोरा ३३ के.व्ही. सुरु करावे, यासाठी परिसरातील शेतक-यांनी वेळोवेळी लेखी निवेदने, आंदोलने केली आहेत. याचा परिणाम म्हणून ३३ के.व्ही.उपकेंद्र तात्काळ कार्यान्वित करण्यात आले. या विषयी शेतक-यांनी वेळोवेळी अधिका-यांना धारेवर धरले होते. त्याचा राग मनात ठेवून आकसबुध्दीने हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शेतक-यांवरील गुन्हे मागे घ्यावेत, खोटे गुन्हे दाखल करणा-या अधिका-यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसाचे तालुकाध्यक्ष रामधन कळंबे, सुरेश गवळी, दीपक बोराडे, कुंडलिक मुठ्ठे, दिनकर अंभोरे, प्रभाकर अंभोरे, सुनील अंभोरे, अनंत अंभोरे, दाभाडे, दिनकर अंभोरे, दत्ता अंभोरे, ज्ञानेश्वर अंभोरे, ज्ञानेश्वर शिंदे, महादू अंभोरे, संजय अंभोरे, नितीन शिवणकर यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.