भोकरदन तहसीलचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 12:40 AM2019-01-23T00:40:44+5:302019-01-23T00:41:13+5:30
भोकरदन तहसील कार्यालयाकडे वीजवितरण कंपनीचे ७ लाख ६६ हजार रुपयाचे विजबिल थकल्याने मंगळवारी वीजवितरण कंपनीने तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन तहसील कार्यालयाकडे वीजवितरण कंपनीचे ७ लाख ६६ हजार रुपयाचे विजबिल थकल्याने मंगळवारी वीजवितरण कंपनीने तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. यामुळे तहसील कार्यालयाचे दिवसभर कामकाज ठप्प होते. तर तहसील कार्यालयाने सुध्दा वीजवितरण कंपनीकडे ३ लाख रूपयांची अकृषक कर थकबाकी असल्यामुळे वसुलीसाठी कर्मचारी पाठविले होते.
भोकरदन येथील विजवितरण कंपनीचे तहसील कार्यालयाकडे ७ लाख ६६ हजार रूपये वीजबिल थकले होते. संबंधित वीजबिल भरण्यासाठी वीजवितरण कपंनीने तहसील कार्यालयाला वेळोवेळी नोटीसा दिल्या होत्या. मात्र, तहसील कार्यालयाने वीजबिल भरले नाही. त्यामुळे कंपनीचे उपकार्यकारी अभियंता दीपक तुरे यांनी कर्मचाऱ्यांना पाठवून तहसील कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला. यामुळे दिवसभर कार्यालयाचे कामकाज ठप्प होते. त्यानंतर तहसीलदार संतोष गोरड यांनी दोन दिवसात वीजबिल भरण्याचे आश्वासन अधिकाºयांना दिले. परंतु, त्यानंतरही वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला नाही. त्यामुळे तहसीलदारांनी वीजवितरणकडे अकृषक कराचे थकलेले पैसे तात्काळ भरण्याचे सांगून कंपनीला कुलूप लावण्यासाठी कर्मचा-यांना पाठवले.