मंठावासियांच्या तोंडचे पाणी पळाले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 12:48 AM2018-02-16T00:48:09+5:302018-02-16T00:48:12+5:30
अठरा लाखांचा वीजबिल भरणा थकल्याने महावितरणने मंठा शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प असून, नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.
मंठा : अठरा लाखांचा वीजबिल भरणा थकल्याने महावितरणने मंठा शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा तीन दिवसांपासून ठप्प असून, नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू आहेत.
मंठा शहराला पाणीपुरवठा करणा-या नळयोजनेचा विद्युत पुरवठा शनिवारी वीज बिल न भरल्यामुळे तोडण्यात आला. नगरपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना देऊनही वीज बिल न भरल्यामुळे वीजपुरवठा खंडित करावा लागला, असे शाखा अभियंता पी.पी. खंडागळे यांनी सांगितले. एकीकडे शहरातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू असताना नगरपालिकेतील सत्ताधारी व विरोध आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करीत आहेत. एकूण थकबाकीपैकी चार लाखांचे बिल भरण्याचे नियोजन केले असून, दोन दिवसात शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे नगराध्यक्षा पार्वती बोराडे यांनी सांगितले. तर शिवसेनेने विरोध केल्याने वीज बिल भरणा करण्यास विलंब झाला. त्यामुळे नागरिकांवर ही वेळ आल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते शिराज पठाण यांनी केला. उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे म्हणाले, की आपण मुख्याधिकारी व्होरकर यांना याबाबत जिल्हाधिका-यांची भेट घेऊन चर्चा करून वीज बिल भरण्याबाबत तरतूद करण्यास सांगितले. शिवसेनेची भूमिका सकारात्मक असल्यावे सांगून त्यांनी काँग्रेसने केलेले आरोप फेटाळले.