ओबीसींचा एल्गार; गावबंदीचे फलक हटवा, दादागिरी चालू देणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2023 07:02 AM2023-11-18T07:02:58+5:302023-11-18T07:03:04+5:30
महाराष्ट्र तुमच्या सातबारावर लिहिला का? आम्हाला आरक्षण घटनेने दिले : भुजबळ
- विजय मुंडे/ अशोक डोरले
अंबड (जि. जालना) : आज मराठा समाजाचा नेता निर्माण झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, धनगर, माळी, तेली हे मध्येच घुसले. त्यांना अभ्यास कळत नाही. आम्हाला आरक्षण घटनेने दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. मंडल आयोगाने दिले. नऊ न्यायमूर्तींनी त्यावर शिक्का मारला. आम्ही हक्काचे खातो, सासरच्या घरी तुकडे मोडत नाही, असे टीकास्त्र मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे नाव न घेता सोडले.
दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला? महाराष्ट्र तुमच्या सातबारावर लिहिला का? असा सवाल करीत दादागिरी चालू देणार नाही, गावबंदीचे फलक शासनाने हटवावेत, अशी मागणीही भुजबळांनी केली. अंबड (जि. जालना) येथे शुक्रवारी दुपारी आयोजित ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या ओबीसी समाजबांधवांना ते संबाेधित करत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, नारायण मुंडे, बबनराव तायवाडे, आ. राजेश राठोड, देवयानी फरांदे व इतर ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही भुजबळांनी दिला.
१०० एकर मैदान तुडुंब
अंबड येथील १०० एकर मैदान गर्दीने तुडुंब भरले होते. रस्त्यावरही गर्दी होती. शहराच्या विविध भागांताल पार्किंग परिसर अपुरे पडल्याने वाहने रस्त्यांवर लावण्यात आली होती.
कोड नंबर देऊन हल्ले
बीडमध्ये झालेले हल्ले कोड नंबर देऊन झाले होते. अनेक ग्रुप होते. पेट्रोल बॉम्ब तयार होते. चॉपर तयार होते. ४००-४०० जणांच्या जमावाने हल्ला केला, असे भुजबळ म्हणाले.
ओबीसींच्या हक्काला धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, अशी ही सभा आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. महाराष्ट्राचे चित्र बदलण्याची ताकद निर्माण करू.
- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासंबंधी घोषणा केली आहे. मात्र, हे करीत असताना ओबीसी समाजावर अन्याय होईल, असा निर्णय राज्य सरकार करणार नाही. सर्व समाजाला विनंती करू इच्छितो की, महाराष्ट्रात कुठलेही समाज एकमेकांसमोर उभे आहेत, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणे योग्य नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ओबीसींचा पक्ष काढा : जानकर
जोपर्यंत ओबीसींचा स्वत:चा पक्ष होत नाही, तोपर्यंत आपल्या लढ्याला चालना मिळणार नाही. ओबीसींचा पक्ष काढा. दुसऱ्या पक्षाचे आमदार आपल्याकडे येतील, असे महादेव जानकर यावेळी म्हणाले.
पंकजा मुंडे यांच्या अनुपस्थितीची चर्चा
ओबीसी एल्गार सभेदरम्यान माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण अनेकांनी काढली. त्यांचे छायाचित्र घेऊन अनेकजण या सभेत सहभागी झाले होते. परंतु, या सभेला माजी मंत्री पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.