अमर रहे..च्या घोषणांनी परिसर झाला भावनिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:18 AM2019-02-17T00:18:33+5:302019-02-17T00:18:58+5:30
जम्मू -काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन शिवाजी राठोड यांचे पार्थिव शनिवारी जालना शहरातून त्यांच्या गावी नेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जम्मू -काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन शिवाजी राठोड यांचे पार्थिव शनिवारी जालना शहरातून त्यांच्या गावी नेण्यात आले. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे औरंगाबाद मार्गावर त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी नागरिकांनी दिलेल्या अमर रहे, अमर रहे, विर जवान अमर रहे च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.
बुलडाणा जिल्ह्यातील जवान नितीन शिवाजी राठोड हे पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झाले. त्यांचे पार्थिव शनिवारी सकाळी विमानाने औरंगाबादेत आणण्यात आले. त्यानंतर एका वाहनाने त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी नेताना, त्यांना सलामी देण्यासाठी मोठ्याप्रमाणावर नागरिकांनी औरंगाबाद मार्गावर गर्दी केली. 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्', 'पाकिस्तान मुदार्बाद, 'अमर रहे' , 'अमर रहे' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. सलामी दिल्यावर जवानांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी रवाना करण्यात आले.
याप्रसंगी पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. नारायण कुचे, माजी आ. संतोष सांबरे, जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, जिल्हा प्रमुख भास्कर अंबेकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, एलसीबीचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, काँग्रेसचे शहाराध्यक्ष शेख महेमूद, गणेश राऊत यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येन उपस्थिती होती.
श्रध्दांजलीसाठी अनेकांची उपस्थिती
शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव जालना शहरात येणार असल्याची बातमी शहरात पसरली. त्यानंतर प्रत्येकाने औरंगाबाद चौफुलीकडे धाव घेत शहीद जवान राठोड यांना श्रध्दांजली दिली.
अन प्रत्येकजण झाला भावूक
शहीद जवान राठोड यांना श्रध्दांजली अर्पण करतावेळेस उपस्थित नागरिक भावूक झाले होते. यातील काही जणांच्या डोळ््यात तर अश्रू तरळले होते.
पार्थिव येताच भारत माता की जयच्या घोषणा
शहीद जवान नितीन राठोड यांचे पार्थिव औरंगाबाद चौफुली येथे येताच उपस्थितांनी भारत माता की जयच्या दिल्या. पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत नागरिकांनी हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.