बोंडअळीचा धसका; डिसेंबरपर्यंत उत्पादन देणाऱ्या कपाशीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:50 AM2018-05-29T00:50:24+5:302018-05-29T00:50:24+5:30
गेल्यावर्षी बोंड अळीच्या हल्ल्याने कपाशीचे उत्पादन घटले होते. तशी स्थिती यंदा होऊ नये म्हणून केवळ डिसेंबर पर्यंतच कपाशीचे उत्पादन देणा-या बियाणांचीच लागवड करावी, अशा सचूना कृषी विभागाने शेतक-यांना दिल्या आहेत.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गेल्यावर्षी बोंड अळीच्या हल्ल्याने कपाशीचे उत्पादन घटले होते. तशी स्थिती यंदा होऊ नये म्हणून केवळ डिसेंबर पर्यंतच कपाशीचे उत्पादन देणा-या बियाणांचीच लागवड करावी, अशा सचूना कृषी विभागाने शेतक-यांना दिल्या आहेत. त्यामुळे बोंड अळीचा हल्ला रोखण्यासाठीचे हे उपाय असल्याचे सांगण्यात आले.
यंदा मान्सूनचे आगमन अंदमान-निकोबारच्या समुद्रात झाल्याने तो यंदा वेळेवर बरसेल, अशी आशा आहे. या पार्श्वभूमीवर कृषी विभाग, बियाणे व्यापारी व शेतकºयांनी जय्यत तयारी केली आहे. यंदा कपाशीचे क्षेत्र घटणार अशी चिन्हे असली तरी, कृषी विभागाने आठ लाख बिटीची पाकीटे मागवली असून, जवळपास पावणेतीन लाख पाकीट विक्रीसाठी संबंधित दुकानांवर वितरीत केली आहेत. बियाणांप्रमाणे खतांचा साठाही मूबलक प्रमाणात असल्याची माहिती जि.प.चे कृषी विस्तार अधिकारी हरिचंद्र झनझन यांनी दिली आहे.
यंदा हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पाऊस वेळेवर पडण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतक-यांनी शेतीची पेरणीपूर्व मशागत पूर्ण केली आहे. आता मृग नक्षत्र लागल्यावर एक, दोन चांगले पाऊस झाल्यानंतर शेतकरी खरिपाच्या पेरणीला सज्ज होणार आहे.
यंदा जून अखरेपर्यंत खरीपाची किमान ५० टक्के पेरणी होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात पाच लाख ९७ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यात कपाशीचे दोन लाख ७५० हेक्टर एवढे क्षेत्र आहे.
कपाशी पाठोपाठ सोयाबीन लागवडीला जिल्ह्यात प्राधान्य दिले जाते. सायोबीनचे क्षेत्र हे एक लाख ३३ हजार हेक्टर असून, त्यासाठी २५ लाख ३५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यात महाबीजकडून ८ हजार क्विंटल बियाणे देणे आहे. अन्य पिकांच्या क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यत आहे.
बियाणांसह खतांचा मुबलक साठा
जिल्ह्यात यंदा कपाशी, सोयाबीनसह अन्य वाणांची बियाणे उपलब्ध करून देण्यात आली असून, बियाणांसह खतांचाही मुबलकसाठा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. यंदा एक लाख ८३ हजार मेट्रीक टन खताची मागणी केली होती. पैकी एक लाख ६६ मेट्रीक टन खत जालन्यात दाखल झाले आहे. आतापर्यंत ५८ हजार मेट्रीक टन खत बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे.