पायाभूत सुविधा देण्यावर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 12:46 AM2018-10-03T00:46:00+5:302018-10-03T00:46:39+5:30
हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता, मात्र तो खरा न ठरल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविला होता, मात्र तो खरा न ठरल्याने दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. असे असले तरी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत वडीगोद्री ते जालना या रस्ता रूंदीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
अंबड येथील महावीर चौकात हा कार्यक्रम पार पडला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, आ. नारायण कुचे, आ.संतोष दानवे, आ.अतुल सावे, आ.राजेश टोपे, माजी आ. विलास खरात, माजी आ. अरविंद चव्हाण, रामेश्वर भादरंगे, नगराध्यक्षा संगीता कुचे, मराठवाडा वैधानिक मंडळाचे अध्यक्ष भागवत कराड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारने चांगले आणि दर्जेदार रस्ते निर्मितीसाठी भरीव निधी देऊ केला आहे. चार वर्षांत केंद्र सरकारने राज्याला एक लाख १६ हजार कोटी रूपयांचा निधी हा केवळ रस्ते विकासासाठी दिला आहे. यातून १६ हजार कोटी रूपयांचा मुंबई ते गोवा या महामार्गाचे काम सुरू आहे. राज्यातील इतर प्रमुख रस्ते देखील चौपदरी तसेच दुपदरी करण्याची विशेष मोहीमच हाती घेतली आहे. वाढलेली वाहतूक लक्ष घेऊन सिमेंटचे रस्ते तयार करण्याला प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंत्राटदारांना रस्ते दर्जेदार करण्यासाठी ३० हजार कोटींचे दीर्घ मुदतीचे कर्ज देऊ केल्याचेही पाटील यांनी सांतितले.
चांगले रस्ते असतील तर त्या देशाची आणि गावाची प्रगती होते असेही ते म्हणाले. एकूणच रस्ते बांधणीसह अन्य मूलभूत सुविधा देण्यासाठी सरकार वचनबध्द आहे. शेतक-यांच्या हितासाठी देखील सरकारने निर्णय घेतले असून आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी राज्य सरकारने दिल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आ. राजेश टोपे, भाजपा तालुका अध्यक्ष अवधुत खडके आदींंची भाषणे झाली. यावेळी परिसरातील शेतकरी व नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
वचनपूर्ती : जिल्ह्याचा चेहरा बदलणार : रावसाहेब दानवे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, आपण जोपर्यंत या रस्त्याचे रूंदीकरण करणार नाही तोपर्यंत या भागात मत मागण्यासाठी येणार नाही; परंतु आता त्यापूर्वीच मी दिलेले वचन पूर्ण केले आहे. यापूर्वीच्या सरकारने हा महत्त्वाचा रस्ताही पूर्ण न केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. जालना जिल्ह्यात विविध प्रकल्पांच्या माध्यमातून विकासाची गंगा आपण खेचून आणली आहे. त्यात प्रामुख्याने ड्रायपोर्ट, आयसीटी महाविद्यालय यासह आता नवीन कौशल्य विकास केंद्र सुरू करणार आहोत. सिडको प्रकल्पही जालन्यात येऊ घातला असून, जालना शहरातील रस्ते तसेच अंतर्गत जलवाहिनीसाठी १५० कोटी रूपयांचा निधी दिल्याचे खा. रावसाहेब दानवे यांनी सांगितले.
शेतक-यांच्या हितालाही भाजप सरकारने नेहमीच प्राधान्य दिले आहे. कुठल्याही छोट्याशा कारणावरून मोर्चे काढून विरोधकांकडून सामान्यांची दिशाभूल केली जात आहे. याकडे नागरिकांनी लक्ष न देण्याचे आवाहन दानवे यांनी यावेळी केले.
आरक्षणासाठी घोषणाबाजी
सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा ऐरणीवर आणला होता; परंतु आता चार वर्षे उलटल्यावरही याबद्दल काही निर्णय घेतला नाही. याचा निषेध म्हणून कार्यक्रमास उपस्थित काही धनगर समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकारने आरक्षणाचा मुद्दा गंभीरतेने घेण्याचा इशाराही देण्यात आला.
मनसेकडून काळे झेंडे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महसूल मंत्री चंद्रकांत पाटील तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांना काळे झेंडे दाखवून निषेध नोंदविला. हा रस्ता चौपदरीकरण झाला पाहिजे अशी मागणी असतांना केवळ रूंदीकरण होत असून, या रस्त्याच्यामधून दुभाजकही नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. किमान दुभाजक असणे गरजेचे होते, असे त्यांचे म्हणणे आहे.