कुंभार पिंपळगावात अस्वच्छतेचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:34 AM2021-03-01T04:34:50+5:302021-03-01T04:34:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील वीस हजार लोकसंख्येच्या कुंभार पिंपळगाव येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील वीस हजार लोकसंख्येच्या कुंभार पिंपळगाव येथे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून, नालेही तुंंबले आहेत. गावातील अस्वच्छतेमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे.
कुंभार पिंपळगाव येथील बसस्थानक, जुनी पोलीस चौकी, प्रियदर्शनी बँकेसमोर, मार्केट कमिटी परिसर, कुंभार खिडकी परिसर, गणपती गल्ली, ग्रामपंचायतीसमोर, जिल्हा परिषद शाळा परिसर, आदी भागात अस्वच्छता पसरली आहे. गावात अनेक भागात घंटागाडी येत नाही तर काही भागात घंटागाडी येऊनही अधिकवेळ थांबत नसल्याच्या तक्रारी आहेत. गावातील गणपती गल्ली भागात अंगणवाडीसमोर कचऱ्याचे ढिगारे आहेत. गावातील विविध भागातील नालेही तुंबले असून, दुर्गंधी पसरली आहे. एकूणच अस्वच्छतेमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले असून, ग्रामपंचायतीने गावात स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
गावातील स्वच्छतेच्या कामासाठी ग्रामपंचायत प्रशासन प्रयत्नशील आहे. लवकरच स्वच्छतेबाबत आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या जातील.
- महादेव रूपनवर, ग्रामसेवक