स्तुत्य उपक्रम ! ‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ पुरस्काराने कोरोना योद्ध्यांचा होणार गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 06:52 PM2020-07-24T18:52:26+5:302020-07-24T18:53:33+5:30
‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ पुरस्काराचे प्रत्येक आठवड्याला होणार वितरण
जालना : कोरोनाच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, स्वच्छता विभागातील अधिकारी, कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. कोरोनाच्या काळात उत्कृष्ठ काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांना प्रत्येक आठवड्याला ‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ या पुरस्काराने गौरव करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी घेतला आहे. रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन या कोरोना योद्ध्यांचा गौरव केला जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी आयोजित विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आरोग्य विभागातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांवर कोरोनाबाधितांवर उपचाराची मोठी जबाबदारी आहे. या काळात डॉक्टर, नर्सेस, सेवक व सफाई कर्मचारी हे स्वत:ची, आपल्या कुटुंबाची पर्वा न करता दिवसरात्र काम करत आहेत. अशा कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. याच भावनेतून ‘एम्प्लॉई ऑफ द् वीक’ हा पुरस्कार वितरणाचा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक आठवड्यात उत्कृष्ट काम करणाऱ्या डॉक्टरांना चार हजार रूपये रोख व प्रशस्तीपत्र, परिचारिकेला तीन हजार रुपये, वॉर्डबॉयला दोन हजार रूपये व सफाई कर्मचाऱ्याला एक हजार रूपये रोख व व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र परळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भोसले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, डॉ. जगताप आदींची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी स्वत: देणार रक्कम
या पुरस्काराची रक्कम कोणत्याही शासकीय निधीतून दिली जाणार नाही. यासाठी प्रत्येक अधिकाऱ्यांसह इतरांनी इच्छेनुसार या बक्षिसाची रक्कम द्यायची आहे. पहिल्या आठवड्यातील पुरस्काराची रक्कम जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे स्वत: देणार आहेत. जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहनही रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.