तालुकास्तरीय युझर आयडी कार्यान्वित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:31 AM2021-07-28T04:31:19+5:302021-07-28T04:31:19+5:30
रस्त्यांची दुरवस्था अंबड : तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात या खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. ...
रस्त्यांची दुरवस्था
अंबड : तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात या खराब रस्त्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. प्रवाशांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे बांधकाम विभागाने लक्ष देऊन रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कोठाकोळी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
भोकरदन : भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई ते कोठाकोळी या चार किलोमीटर रस्त्याची मागील तीन ते चार वर्षांपासून दुरवस्था झाली आहे. यामुळे शेतकरी व वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे या चार किलोमीटर रस्त्याचे अंतर कापण्यासाठी ३० मिनिटांचा अवधी लागत असल्याने वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
आन्वा येथे बचत गटांच्या महिलांना मार्गदर्शन
आन्वा : भोकरदन तालुक्यातील कोदा येथे महिला बचत गटांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बचत गटांसाठीच्या विविध योजना, अधिकारी कर्मचारी यांचे संपर्क क्रमांक आदी बाबीही यावेळी पुरवण्यात आल्या. याप्रसंगी नवनाथ पाटील दौड, सरपंच आरती कृष्णा काळे, बचत गटाच्या अध्यक्ष, सचिव व सर्व महिला उपस्थित होत्या. दरम्यान, बचत गटांच्या समस्या महिलांनी यावेळी मांडल्या
सेवली येथील जैन मंदिरात पूजा
सेवली : जालना तालुक्यातील सेवली येथील जैन मंदिरात आष्टानिक पर्वानिमित्त सिध्दचक्राविधान पूजा करण्यात आली. यावेळी सौधर्मपद साधना मुकुंदराव यांनी भूषवले, तर पतेंद्रपद निखिल शैलेश कुरकुटे यांनी भूषवले. या दिनानिमित्त सकाळी अभिषेक करण्यात आला, तर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांनंतर संध्याकाळी आरती व प्रवचन घेण्यात आले. २४ जुलै रोजी होमहवनही करण्यात आले. या कार्यक्रमासाठी गावातील सर्व जैन बांधव, महिला मंडळ यांची उपस्थिती होती.
कृष्णा इंगळे यांची राज्याध्यक्षपदी निवड
जाफराबाद : महाराष्ट्र राज्य संगणक शिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षपदी शिवव्याख्याते प्रा. कृष्णा इंगळे यांची शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्या आदेशान्वये निवड करण्यात आली आहे. मान्यवरांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल संघटनेचे राज्य सरचिटणीस रामेश्वर पवार, परमेश्वर इंगळे, वाघमारे, भगवान देठे यांच्यासह अनेक शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
मोबाईल चोरीप्रकरणी आरोपींना कोठडी
आष्टी : परिसरातील श्रीष्टी येथील आठवडी बाजारातून खिशातून मोबाईलची चोरी करून पसार होण्याच्या प्रयत्नात असताना रंगेहात पकडलेल्या तीन जणांना तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. शनिवारी श्रीष्टी येथील रामराव अँभुरे हे आठवडी बाजारात भाजीपाला घेत असताना नजर चुकवून त्यांच्या शर्टच्या खिशातील मोबाईल चोरीत असतांना गावकऱ्यांनी तिघांना पकडले होते.
लोकसहभागातून वृक्षलागवड
आष्टी : पंचायत समिती, परतूरच्या वतीने आष्टी येथे लोकसहभागातून सोमवारी वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी रंगनाथ येवले, पंचायत समितीचे उपसभापती राम प्रसाद थोरात, कृषी अधिकारी आर. टी. बोनगे, गगन बोने, सरपंच महादेव वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर मोरे, नसरुल्लाह काकड, आबा सोळंके, अशोक कांबळे उपस्थिती होती. यावेळी विविध जातींच्या झाडांची लागवड करण्यात आली.