शेतकऱ्यांची चिंता संपता संपेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 12:41 AM2018-09-22T00:41:21+5:302018-09-22T00:42:28+5:30
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आजही चिंतेत आहे. जिल्ह्यात २०१८ यावर्षी ३ लाख २९ हजार शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीत पाहिजे तेवढे उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी आजही चिंतेत आहे. जिल्ह्यात २०१८ यावर्षी ३ लाख २९ हजार शेतकरी कुटुंबियांचे सर्वेक्षण करण्यात आले. यात ३३९ शेतकरी तणावग्रस्त असल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रेरणा प्रकल्पांतर्गत केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.
शेतकरी आत्महत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता शासनाने शेतकरी आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत विदर्भ व मराठावाडा विभागाच्या १४ जिल्ह्यांतील शेतकरी कुटुंबांना आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासंर्दभात प्रेरणा प्रकल्प सुरु केला. याची माहिती देण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर सोपविलेली आहे. शासन निर्णयानुसार जालना जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालये व जिल्हा रुग्णालयांतर्गत नोव्हेंबर २०१५ पासून हा कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कासवगतीने सुरु झालेल्या कार्यक्रमात सद्य: स्थितीत उत्कृष्ट सेवा बजावणे सुरु केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक संजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली दीपाली मुळे, नितीन पवार, मनोविकृती तज्ञ डॉ. सदीप लहाने, चिकित्सालयीन मानसशास्त्रज्ञ महेंद्र बोबडे, स्वाती जाधव हे या प्रकल्पांतर्गत शेतकºयांना समुपदेशन करुन आत्महत्येपासून थांबविण्याचे प्रयत्न करीत आहेत. या उपक्रमाचे फलित झाल्याचे दिसत आहे.
नऊ महिन्यात ६२ शेतकºयांच्या आत्महत्या
जिल्ह्याभरात मागील ९ महिन्यांमध्ये ६२ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. यात जुन महिन्यात सर्वाधिक १३ शेतकºयांनी आत्महत्या केल्या आहे. शेतकºयांनी नैराश्य, तणाव, बिकट आर्थिक परिस्थिती अर्थिक परिस्थिती, नापिकी यासारख्या विविध कारणांमुळे जीवन संपविल्याचे समोर आले आहे.
अशी करतात जनजागृती
शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दरवर्षी जागतिक आत्महत्या दिनी सप्ताह राबविण्यात येतो. आशा मार्फत जनजागृती करण्यात येते. विविध कार्यक्रमाचे आयोजन करुन शेतकºयांना याची माहिती दिली जाते. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुंटुबांना भेटी दिल्या जातात.
अशी होते तपासणी
आशा स्वयंसेविका शेतकºयाच्या घरी जाऊन सर्वेक्षण करतात. जे शेतकरी तणावग्रस्त आहेत. अशांना टोल फ्री क्रमाकांवर समुपदेशन केले जाते. त्यानंतर प्राथमिक रुग्णालय, ग्रामीण, उप जिल्हा व शेवटी जिल्हा रुग्णालयात उपचार केले जातात. त्यानंतर सदरील शेतकºयाला तणावग्रस्त घोषित करुन त्यावर आवश्यक ते उपचार करुन त्याचे मन परिवर्तन केले जाते.
प्रत्येक सहा महिन्याला होते सर्वेक्षण
प्रेरणा प्रकल्पांतर्गत प्रत्येक सहा महिन्याला हे सर्वेक्षण होते. जुलैपर्यत झालेल्या सर्वेक्षणात ३ लाख २९ हजार कुंटुबियांना भेटी दिल्या. यामध्ये सौम्य -२३८, मध्यम- ६२, तर तीव्र ६ शेतकरी तणाव खाली असल्याचे समोर आले आहे.