अभियांत्रिकी प्रवेशाचा तिढा सुटता सुटेना...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 11:44 PM2019-06-18T23:44:46+5:302019-06-18T23:45:19+5:30
गेल्या चार दिवसांपासून रजिस्ट्रेशनसाठी जी वेबसाइट दिली आहे, ती उघडत नसल्याने विद्यार्थी आणि पालक वैतागले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्यातील मत्स्योदरी महाविद्यालयात राज्य सरकारच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून यंदा अभियांत्रिकीसह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सेतू सुविधा केंद्र स्थापन केले आहे. मात्र, ऐनवेळी गेल्या चार दिवसांपासून रजिस्ट्रेशनसाठी जी वेबसाइट दिली आहे, ती उघडत नसल्याने विद्यार्थी आणि पालक वैतागले आहेत.
यंदा प्रथमच अभियांत्रिकीसह कृषी, बी फार्म इ. व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी सेतू सुविधा केंद्रात रजिस्ट्रेशनसाठीची व्यवस्था केली आहे. त्यासाठी मत्स्योदरी महाविद्यालयात हे केंद्र चार दिवसांपूर्वीपासून सुरू केले होते. यावेळी येथे बारावी तसेच तंत्रनिकेतनचे निकाल लागल्या नंतर अभियांत्रिकी, बीफार्म, कृषी अभियांत्रिकीसाठी प्रवेश मिळावा म्हणून विद्यार्थ्यानी मोठी गर्दी केली होती. परंतु तंत्र शिक्षण विभागाने अचानकपणे शेड्युलमध्ये बदल केल्याने प्रवेश प्रक्रियेवरच त्याचा विपरित परिणाम झाला आहे. पूर्वी राजिस्ट्रेशनसाठी अंतिम तारीख ही २१ जून होती, त्यात बदल करण्यात आले आहेत. त्यातच रजिस्ट्रेशनसाठी जी वेबसाइट नमूद केली होती. ती देखील अनेकवेळा प्रयत्न करूनही ती उघडत नसल्याच्या तक्रारी आहेत.
जिल्ह्यात केवळ मत्स्योदरी महाविद्यालयातच या प्रवेशासाठी सेतू केंद्र स्थापन केले आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालकांनी मत्स्योदरीच्या प्राचार्यांसह अन्य शिक्षकांना अक्षरश: भंडावून सोडले आहे. याबाबत मत्स्योदरीने औरंगाबाद येथील तंत्र श्क्षिण उपसंचालकांकडे याची माहिती कळवली आहे, परंतु त्यातूनही काहीच हाती लागले नाही. नवीन प्रवेश वेळापत्रक जाहीर झाल्याने आता रजिस्ट्रेशनसह पहिली यादी तसेच अन्य प्रवेश प्रक्रियेच्या तारखांमध्ये बदल केले आहेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये यापूर्वीच संपूर्ण राज्याचा विचार केल्यास काही हजार जागा गेल्यावर्षी रिक्त होत्या. त्यामुळे यंदा तसे होऊ नये म्हणून सरकार आणि खासगी विद्यालयांनी जागा भरण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील अनेक नामांकित महाविद्यालयांनी त्यांच्या प्रवेशाच्या जाहिराती या बिहार, उत्तर प्रदेश, नागालँड, आसाम यासह अन्य राज्यात झळकल्या आहेत. आता त्या भागातूनच अभियांत्रिकीसाठी विद्यार्थी मिळतील अशी शक्कल लढवली जात आहे.