अभियंते, बी.टेक.धारकही ‘खाकी’च्या रांगेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 01:00 AM2018-04-10T01:00:13+5:302018-04-10T10:41:26+5:30
पोलीस भरती प्रक्रियेसाठी केवळ बारावी उत्तीर्णची अट असताना चक्क संगणक अभियंते, प्राध्यापक व बी.टेक. झालेल्या उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेत लेखी परीक्षेला हजेरी लावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाढत्या स्पर्धेमुळे प्रत्येकजण मिळेल ती नोकरी करण्याची तयारी ठेवत आहे. येथील पोलीस भरती प्रक्रियेसाठी केवळ बारावी उत्तीर्णची अट असताना चक्क संगणक अभियंते, प्राध्यापक व बी.टेक. झालेल्या उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेत सहभाग घेत लेखी परीक्षेला हजेरी लावली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आस्थापनेवरील ५० जागांसाठी नुकतीच पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली. ५० हजार जागांसाठी सुमारे दहा हजारांवर अर्ज प्राप्त झाल्याने येणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षात घेता जिल्हा पोलीस दलाने सुुरुवातीपासून चोख नियोजन ठेवले होते. पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी बारावी उत्तीर्णची अट असताना चक्क बीई, बी.टेक, अॅग्रिकल्चरल, बीपीएड, एमपीएड, इंटेरिअर डिझायनिंग, एमबीए, एम. लिब, एम. एसस्सी, बी. एसस्सी अग्री व विविध विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या ६७५ उमेदवार आॅनलाईन अर्ज भरून पोलीस भरतीच्या मैदानात उतरले. यामध्ये ३२४ बी.एससी तर विविध विषयांत एमएम झालेल्या १९७ उमेदवारांचा समावेश होता. मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण १३१२ उमेदवारांना प्राप्त गुणांच्या आधारे लेखी परीक्षेला बोलावण्यात आले होते. पोलीस भरतीची लेखी परीक्षा देणाºयांमध्येही उच्च शिक्षित उमेदवारांची संख्या दीडशेंवर होती, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली. एकंदरीत नोकरीच्या मर्यादित संधी, वाढते वय यामुळे उमेदवार मिळेल ती नोकरी पदरात पाडून घेण्यासाठी धडपड करताना दिसत आहे.
मैदानी चाचणी व लेखी परीक्षेच्या एकत्रित गुणांची यादी पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची तात्पुरती यादी लावण्यात आली असून, त्यावर कुणास काही आक्षेप असल्यास तो दाखल करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.