इंग्लंड- दक्षिण आफ्रिका सामन्यावर रांजणीत सट्टा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:54 AM2020-02-18T00:54:12+5:302020-02-18T00:56:31+5:30
घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील मेडिकलमध्ये इंग्लंड- द. आफ्रिका टी-टष्ट्वेंटी मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्याविरूध्द एडीएस पथकाने (दरोडा प्रतिबंधक पथक) कारवाई केली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील मेडिकलमध्ये इंग्लंड- द. आफ्रिका टी-टष्ट्वेंटी मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्याविरूध्द एडीएस पथकाने (दरोडा प्रतिबंधक पथक) कारवाई केली. ही कारवाई रविवारी रात्री करण्यात आली असून, कारवाईत ५७ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी तिघांविरूध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रांजणी बसस्थानकाजवळ असलेल्या मेडिकल दुकानात इंग्लंड- साऊथ आफ्रिका टी- ट्वेन्टी मॅचवर सट्टा सुरू असल्याची माहिती एडीएसचे प्रमुख पोनि. यशवंत जाधव यांना मिळाली होती. या माहितीवरून पथकाने रविवारी रात्री रांजणी येथील आनम मेडिकल दुकानावर कारवाई केली. मेडिकलमध्ये असलेल्या अख्तर अली सय्यद अली (रा. रांजणी) याच्या मोबाईलची तपासणी केली असता मून एक्सचेंज ९९ लिंक सुरू होती. यात इंग्लंड- साऊथ आफ्रिका टी- टष्ट्वेंटी मॅच सुरू असल्याचे दिसून आले. याबाबत चौकशी केल्यानंतर सय्यद याने सांगितले की, ती लिंक जालना येथील रोहित यांनी पाठविली आहे. त्यांच्या सांगण्यावरून मला सट्ट्यात जिंकलेले पैसे रोहित देतो. तसेच दीपक (रा. सेलू जि.परभणी) यांनी रोहितची ओळख करून दिली. त्या दोघांच्या सांगण्यावरून आपण मॅचमध्ये हार-जीतवर सट्टा घेत असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी मोबाईल, रोख ४७ हजार ८०० रुपए असा एकूण ५७ हजार ८०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वरील तिघांविरूध्द घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि यशवंत जाधव, पोहेकॉ रामप्रसाद रंगे, सुभाष पवार, राजू पवार, विजय निकाळजे यांच्या पथकाने केली.