अॅडविक क्लबच्या पुढाकारातून पूरग्रस्तांना भरभरून मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 01:04 AM2019-08-14T01:04:11+5:302019-08-14T01:04:50+5:30
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जालना शहरातील अॅडविक क्लबच्या युवकांनी पुढाकार घेत सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीने तीन टेम्पो साहित्याचे संकलन केले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : कोल्हापूर, सांगली परिसरात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी जालना शहरातील अॅडविक क्लबच्या युवकांनी पुढाकार घेत सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीने तीन टेम्पो साहित्याचे संकलन केले आहे. हे तीन टेम्पो सांगलीकडे रवाना झाल्याचे क्लबचे अध्यक्ष राहुल अग्रवाल यांनी सांगितले.
जालना शहरातील अॅडविक क्लबचे युवक सतत सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेतात. अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली, सातारा भागातील नद्यांना पूर आला आणि शहरांसह अनेक गावे पाण्याखाली गेली. यात लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. कोल्हापूर, सांगली भागातील भीषण परिस्थिती पाहून पूरग्रस्तांना मदत करण्याचा निर्णय अॅडविक क्लबच्या सदस्यांनी घेतला. अध्यक्ष राहूल किशोर अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य नागरिकांच्या सहकार्यातून दैनंदिन साहित्य, अन्नधान्य, पाण्याच्या बॉटल, कपडे, औषधी आदी विविध साहित्याचे संकलन केले. विशेषत: तीन टेम्पो भरून साहित्य जमा करण्यात आले आहे. हे साहित्य सांगलीकडे रवाना झाल्याचे राहूल अग्रवाल, पियुश शहा यांनी सांगितले.
युवक करणार स्वत: वाटप
तीन टेम्पो भरलेले साहित्य घेऊन क्लबचे सदस्य सांगलीकडे रवाना झाले. तेथील प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली ही मदत गरजुंना दिली जाणार आहे. मदत पाठविण्याऐवजी आपण स्वत: गरजू पूरग्रस्तांपर्यंत मदत पोहोचवावी, या भावनेतून आम्ही सांगलीकडे जात असल्याचे राहुल अग्रवाल म्हणाले.
अॅडविक क्लबने पुढाकार घेत शुद्ध पाण्याच्या बॉटलचे ४५० बॉक्स, बिस्कीट पुड्याचे १०० कार्टून, ५०० किलो चिवडा, १ हजार किलो गव्हाचे पीठ, ४०० किलो तांदूळ, तीन हजार सॅनेटरी नॅपकीन, १५०० ब्लँकेट, २ टन डाळी व धान्यासह औषधी, कपडे, साबण आदी साहित्य भरून तीन टेम्पो सांगली जिल्ह्यातील औदुंबर गावाकडे रवाना झाले.
या मदत साहित्यासोबत क्लबचे अध्यक्ष राहुल अग्रवाल, पीयूष शहा, केदार जाधव, सिध्दांत तवरावाला, शिवम लाहोटी, प्रणय बागडी, सौरभ दायमा, रोषण रूणवाल, कुशल गिल्डा हेही रवाना झाले.