चारचाकी लावण्यासाठी जागा पुरेना? घर, दुकानासमोरील पार्किंगमुळे अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:20 AM2021-02-19T04:20:03+5:302021-02-19T04:20:03+5:30
जालना : जालना शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढतच आहे. त्यातच अरूंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनधारकांना सामोरे जावे लागत ...
जालना : जालना शहराचा दिवसेंदिवस विस्तार वाढतच आहे. त्यातच अरूंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला वाहनधारकांना सामोरे जावे लागत आहे. शहरातील रस्ते अरूंद असल्याने चारचाकी व दुचाकी वाहने लावण्यास जागा पुरत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.
जालना शहराची लोकसंख्या ४ लाख ०५ हजार आहे. जिल्ह्यात जवळपास ३ लाख ९७ हजार ५३१ वाहने आहेत. यात ३ लाख १९ हजार २९५ दुचाकी तर ७८ हजार २३६ चारचाकी वाहने आहेत. जालना शहरातील वाढलेल्या वाहनांची संख्या व अरूंद असलेले रस्ते यामुळे शहरातील वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अरूंद रस्त्यांमुळे चारचाकी व दुचाकी वाहने उभी करण्यास जागा पुरत नाही. काही वाहनधारक आपली वाहने रस्त्यावरच उभी करीत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे अनेकजणांना आपला जीव गमवावा लागला तर बहुतांश जण गंभीर जखमी देखील झाले आहेत. त्यातच शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. रस्त्यावर वाहन उभे केल्यास २०० रुपये दंडाची तरतूद आहे.
....तर वाहन मालकावर कारवाई
ज्या वाहनधारकाने रस्त्यावर वाहन उभे केले आहे. त्यावरच कलम १२२ व १७७ अंतर्गत कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना आहेत. त्यांना २०० रुपये दंडाची तरतूद देखील आहे. तसेच भारतीय दंड विधान २८३ अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई केली जाते.
नागरिकांनी रस्त्यावर वाहन उभे करू नये, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव यांनी केले आहे.
कचेरी रोड सर्वात त्रासदायक
जालना शहरातील कचेरी रोड महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्यावरूनच शासकीय कार्यालयांसह इतरत्र जाता येते. परंतु, हा रस्ता अरूंद
आहे. त्यातच काही ठिकाणी वाहनधारक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.