भगवान महावीर जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 01:07 AM2018-03-30T01:07:43+5:302018-03-30T01:07:43+5:30
सकल जैन समाजाच्यावतीने गुरुवारी जालना शहरात भगवान महावीर यांची जयंतीविविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सकल जैन समाजाच्यावतीने गुरुवारी जालना शहरात भगवान महावीर यांची जयंतीविविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त महावीर चौकापासून काढण्यात आलेल्या शोभायात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सकाळी साडेआठ वाजता महावीर चौकात सकल जैन समाजाच्या वतीने शुभागमन ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर भगवान महावीर यांच्या शोभा यात्रेस प्रारंभ झाला. रथात पुष्पहारांची सजवलेली भगवान महावीर यांची पालखी, रथाला जुंपलेल्या बैलजोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक वेशभूषा व डोक्यावर फेटा परिधान केलेल्या जैन भाविकांनी शोभायात्रेत मोठ्या संख्येने सहभाग घेतला. गुरु गणेश अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केलेले बँड व तुतारी वादन मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.
मिरवणुकीत सहभागी भाविकांसाठी ठिकठिकाणी पाणी व फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या शोभायात्रेचा गुरु गणेश सभामंडपात समारोप करण्यात आला. गुरु गणेश सभामंडपात भगवान महावीर यांच्या जीवनचरित्रावर प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच भवान महावीर जन्मकल्याण समिती व जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात अनेकांनी रक्तदान केले. भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक निमित्त आयोजित विविध कार्यक्रमांसाठी सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला.