उद्योजक आता जालन्यात येतील!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2018 12:52 AM2018-05-05T00:52:02+5:302018-05-05T00:52:02+5:30
आतापर्यंत मराठवाड्याच्या वाट्याला शिल्लक राहिलेलेच आले. पण, आता जालना-औरंगाबादमध्ये जागतिक स्पर्धेला आव्हान देईल असा विकास होत आहे. देशातील सर्वोत्तम औद्योगिक पार्क शेंद्रा औद्योगिक वसाहतीत तर, जालन्यात ड्रायपोर्ट तयार होत आहे. त्यामुळे उत्पादनाच्या निर्यातीसाठी जाणारा मराठवाड्यातील उद्योजक मुंबईऐवजी जालन्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
भागवत हिरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आतापर्यंत मराठवाड्याच्या वाट्याला शिल्लक राहिलेलेच आले. पण, आता जालना-औरंगाबादमध्ये जागतिक स्पर्धेला आव्हान देईल असा विकास होत आहे. देशातील सर्वोत्तम औद्योगिक पार्क शेंद्रा औद्योगिक वसाहतीत तर, जालन्यात ड्रायपोर्ट तयार होत आहे. त्यामुळे उत्पादनाच्या निर्यातीसाठी जाणारा मराठवाड्यातील उद्योजक मुंबईऐवजी जालन्यात येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुंबईतील अभिमत विद्यापीठ असलेल्या रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या उपकेंद्राचे भूमिपूजन कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शहरात मुख्य कार्यक्रमात फडणवीस म्हणाले की, पुणे औद्योगिक शहर नव्हते. पूर्वी ते विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जात होते. चांगल्या शिक्षण संस्थांनी कुशल आणि उद्योगांना अपेक्षित मनुष्यबळ तयार केले. त्यामुळे पुण्याचा औद्योगिक विकास झाला.
दळणवळण, पायाभूत सुविधांबरोबर कुशल मनुष्यबळ उद्योगांना आणण्यासाठी चुंबकाचे काम करते. आयसीटीमुळे असे गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ जालन्यात तयार होणार आहे. त्यामुळे जागतिक स्तरावरील स्पर्धेचे वातावरण तयार होईल.उद्योजकांना आता जेएनपीटीसीला जावे लागते. त्यामुळे मोठा वेळ जातो. समृद्धी महामार्ग जालना-औरंगाबादमधून जाणार आहे. त्यामुळे मुंबईत केवळ चार तासात पोहोचता येईल. त्यातच जालन्यात महत्त्वाकांक्षी ड्रायपोर्ट होत असल्याने मराठवाड्यातील उद्योजक जालन्यात येतील, असे फडणवीस यावेळी म्हणाले. दरम्यान, सर्व लोकप्रतिनिधींच्या नजरेतून सुटलेल्या सीड्स पार्कची आठवण मुख्यमंत्र्यांनी करून दिली आणि सर्वजण अवा्क झाले. जालन्यात सीड्स पार्क उभारण्यात येत आहे. या पार्कमध्ये आयसीटीसारखी संस्था महत्त्वाची भूमिका निभावणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. स्मिता लेले यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.
कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. संजय जाधव, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, आ. संतोष दानवे, आ. नारायण कुचे, आ. विक्रम काळे, आ. सुभाष झांबड, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामेश्वर भांदरगे, माजी मा. अरविंद चव्हाण, माजी आ. विलासराव खरात, भाजपचे उपाध्यक्ष भास्कर दानवे, रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू डॉ. जी. व्ही. यादव, मनोज पांगारकर, आशिष मंत्री यांच्यासह रसायन तंत्रज्ञान संस्थेचे प्राध्यापक, संशोधक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी आणि शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
यादव : कुलगुरूंना उपस्थितांचा विसर
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांनी केले. यावेळी बोलताना त्यांचे सगळे लक्ष व्यासपीठावरील मान्यवरांकडे होते. संपूर्ण मनोगत त्यांनी व्यासपीठाकडे बघतच व्यक्त केले. त्यांना जणू सभागृहातील उपस्थितांचा विसरच पडला होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे आगमन झाल्यानंतर राजकीय मंडळींची व्यासपीठावर मोठी गर्दी झाली होती. कुजबूज सुरू असल्याने कुलगुरुंना बोलताना अडथळा निर्माण होता. अखेर हा शैक्षणिक कार्यक्रम आहे. राजकीय नाही. शांत राहा, अशी विनंतीच यादव यांना करावी लागली.
आयआयटी नागपूरात नेल्याचा मुद्दा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी मनोगतात उपस्थित केला होता. याला जोडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आयसीटीची कूळकथा सांगितली. आयसीटीच्या दीक्षांत समारंभात आपण कुलगुरू डॉ. जी. डी. यादव यांना या संस्थेची शाखा मराठवाड्यात सुरू करता येईल का, अशी विचारणा केली. तेव्हा मी नागपुरला शाखा करता का, असे म्हणालो नाही. हे फडणवीसांनी जोर देऊन सांगितले. पण संघाचे संस्कार असल्याने त्यांच्या तोंडून उपकेंद्राऐवजी ‘शाखा’ असाच नामोल्लेख होत गेला.
मराठवाड्याला विकासाची भूक
मराठवाड्यात अनेक कामे प्रलंबित होती. जी आतापर्यंत झालेली नव्हती. ती आता करत आहोत. शेतीचे परिवर्तन करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी योजना सुरू केली असून, यासाठी जागतिक बँकेने ८ हजार कोटींची मदत दिली आहे. मराठवाड्याची विकासाची भूक समजून घेतली. आता कामे करत आहोत. त्यामुळे पुढील काळात मराठवाड्याचा कायापालट होईल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.