बीडनंतर जालन्यात 'लंपी'चा शिरकाव; भोकरदन तालुक्यातील ५ जनावरे बाधित
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 05:08 PM2022-09-10T17:08:12+5:302022-09-10T17:08:51+5:30
शेतकऱ्यांनी सर्व गोठे स्वच्छ ठेवावे, फवारणी करून घावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भोकरदन (जालना): लंपी स्कीन संसर्गजन्य आजाराचा जालन्यात शिरकाव झाला आहे. भोकरदन तालुक्यातील वरुड बु येथील पाच जनावरे बाधित झाली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या आदेशाने या गावापासून 10 किलोमीटचा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे.
वरुड बु येथील काही जनांवरणा ताप, अंगावर गाठी येणे, डोळ्यातून पाणी गळणे अशी लक्षणे असलेल्या आढळून आली होती. पाच जनावरांची नमुने पशुधन अधिकाऱ्यांनी तपासणीसाठी पाठवली होती. शुक्रवारी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तालुक्यात लंपी स्कीनची शिरकाव झाल्याने शेतकरी व दुग्ध व्यावसायिकात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, पशुधन विभागाने विविध उपाययोजनांवर भर दिला असून लसिकरणाला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 400 जनावरांना लस देण्यात आल्याचे प्रभारी पशुधन विकास अधिकारी यु. बी. वानखेडे यांनी दिली. तसेच आणखी 1 हजार जनावरांसाठी लस उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
पशुधनचे पथक धडकले
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डी एस कांबळे, उपमुखकार्यकरी अधिकारी कल्पना क्षीरसागर आणि कर्मचाऱ्यांचे यांचे एक पथक आज वरुड बु व इतर गावात दाखल झाले. त्यांनी जनावरांची पाहणी करून माहिती घेतली.
घाबरून जाऊ नये
शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. हा आजार संसर्गजन्य असून तो माशा, गोचिड, यांच्या माध्यमातून पसरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सर्व गोठे स्वच्छ ठेवावे, फवारणी करून घावी. हा आजार लवकर लक्षात आल्यावर तो 21 दिवसात बरा होतो. वरुड परिसरात जनावरांचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे.
- यु. बी. वानखेडे, प्रभारी पशुधन विकास अधिकारी