भोकरदन तालुक्यात १८२ सार्वजनिक मंडळांकडून गणरायाची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:28 AM2021-09-13T04:28:07+5:302021-09-13T04:28:07+5:30
भोकरदन : कोरोनाच्या सावटाखाली यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जात असून, तालुक्यातील केवळ १८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात ...
भोकरदन : कोरोनाच्या सावटाखाली यंदाचा गणेशोत्सव साजरा केला जात असून, तालुक्यातील केवळ १८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे, तर केवळ ८० गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली आहे. शिवाय गणेश मंडळांकडून कोरोनाबाबत, आरोग्याबाबत जनजागृती केली जात आहे.
मागील वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे गतवर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला होता. यंदा कोरोना बाधितांची संख्या कमी आहे. असे असले तरी रुग्ण आढळून येत आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देत तालुक्यातील केवळ १८२ सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रशासकीय परवानगीने गणरायाची स्थापना केली आहे. भोकरदन पोलीस ठाण्यांतर्गत ५० सार्वजनिक गणेश मंडळांनी गणपतीची स्थापना केली आहे. त्यात भोकरदन शहरातील १५ गणेश मंडळांचा समावेश आहे. पारध पोलीस ठाण्यांतर्गत ६७ व हसनाबाद पोलीस ठाण्यांतर्गत ६५ गणेश मंडळे आहेत. भोकरदन अंतर्गत २३, हसनाबाद २१ आणि पारध अंतर्गत १६ अशा एकूण ६० गावांत एक गाव एक गणपतीची आदर्श संकल्पना राबविण्यात येत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिंग बहुरे यांनी दिली.