जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही जड वाहतूक शहरातूनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:37 AM2019-01-22T00:37:43+5:302019-01-22T00:38:00+5:30
शहरात दिवसा जड वाहतुकीस बंदी असतानादेखील अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरात दिवसा जड वाहतुकीस बंदी असतानादेखील अवजड वाहनांची ये-जा सुरू असल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हाधिका-यांनी जडवाहतूक बंदीचे आदेश पोलीस प्रशासनास दिले होते. मात्र त्यानंतरही शहरात अवजड वाहनांचा प्रवेश सुरूच असून वाहनचालक या वाहतूककोंडीमुळे त्रस्त झाले
आहेत.
जालना शहरातील रस्ते वाहतुकीमुळे सार्वजनिक जीवनास होणारा धोका, अडथळा, व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हाधिका-यांनी एका अधिसूचनेद्वारे सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत शहरात नो एन्ट्री जाहीर केली. शिवाय लक्झरी बसेसनाही सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत नो एन्ट्री दुस-या अधिसूचनेनुसार करण्यात आली. असे असताना शहरात जड वाहने सुसाट घुसखोरी करीत आहेत. यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
आदेशानंतर नव्याचे नऊ दिवस ही कारवाई झाली, त्यानंतर पुन्हा पूर्वी पेक्षाही जास्त प्रमाणात शहरात या जड वाहनांची घुसखोरी सुरू झाली. सलग तीन दिवस लोकमतच्या चमूने पाहणी केली.
या वाहनांची छायाचित्रे कॅमे-यात टिपली आहेत. विशेष बाब म्हणजे शहरातील विविध रस्त्यांवर चौकाचौकातून पोलिसांच्या नाकावर टिच्चून ही वाहने फिरत आहेत. मात्र, त्यांच्यावर कुणीही कारवाई करताना दिसत नाही. या पाहणीत नूतन वसाहत, भोकरदन नाका, कचेरी रोड, शिवाजी पुतळा या परिसरात जड वाहने दिसली.