मेसेज पाठवूनही नाफेडच्या पाच केंद्रांवर शून्य खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:16 AM2019-03-18T00:16:40+5:302019-03-18T00:17:11+5:30
नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सात केंद्रावर तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी जालना आणि मंठा या केंद्रावर खरेदीस प्रारंभ करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नाफेडच्या वतीने जिल्ह्यात सात केंद्रावर तूर खरेदीसाठी नोंदणी करण्यात आली आहे. त्यापैकी जालना आणि मंठा या केंद्रावर खरेदीस प्रारंभ करण्यात आला. मात्र इतर पाच केंद्रावर नोंदणी करुनही शेतकरी फिरकत नसल्याने अद्यापही खरेदी होऊ शकली नाही. यामुळे हमीभाव केंद्रावर खरेदीचा दुष्काळ दिसून येत आहे.
जिल्ह्यातील अंबड, जालना, भोकरदन, घनसावंगी, बदनापूर, मंठा, परतूर या सात ठिकाणी नाफेड आणि राज्य शासनावतीने हमीभाव केंद्र सुरु केली आहे. तूर नोंदणीस तीन वेळा मुदतवाढ देऊनही केंद्रावर शनिवार पर्यंत ७३७ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. जालना आणि मंठा या दोन केंद्रावर तूर खरेदी सुरु करण्यात आली असून शनिवार पर्यंत ६२९ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित पाच केंद्रावर शेतकऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी केली संबंधित शेतकऱ्यांना तूर विक्रीसंदर्भात मेसेज सुध्दा पाठविण्यात आले, असे असतानाही तूर विक्रीसाठी शेतकरी हमीभाव केंद्रावर फिरकतच नसल्याचे चित्र आहे. नाफेडने तुरीला ५६७५ रूपये हमीभाव जाहीर केला आहे.
खुल्या बाजारात तुरीला ४८०० ते ५००० रूपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. यामुळे शेतकºयांना २५० ते ३५० आर्थिक फटका बसत आहे.तूर विकल्यानंतर नाफेडकडून पैसे मिळण्यास दोन ते तीन महिने विलंब होतो. वेळेत पैसे न मिळाल्याने शेतक-यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्याची खंत शेतक-यांनी व्यक्त केली. जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना मात्र हमीभाव केंद्रावर खरेदीचा दुष्काळ आहे.