भर पावसाळ्यातही मिरची ४० रुपये, पालक १० रुपयांना पेंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:33 AM2021-08-12T04:33:57+5:302021-08-12T04:33:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जालना : बदलते वातावरण आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाहेरील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : बदलते वातावरण आणि अपुऱ्या प्रमाणात होणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. परिणामी बाहेरील बाजारातून येणाऱ्या भाजीपाल्याचे दर पावसाळ्यापूर्वीच्या दराप्रमाणेच आहेत.
पावसाळ्यापूर्वी बहुतांश भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. पावसाचे आगमन आणि काही भागांतील पाण्याची उपलब्धता यामुळे मध्यंतरी भाजीपाल्याचे दर काही प्रमाणात खालावले होते. परंतु, नंतर पावसाने दिलेली ओढ आणि उत्पादनात झालेली घट यामुळे शहरातील बाजारपेठेत विक्रीसाठी आलेल्या बहुतांश भाजीपाल्याचे दर उन्हाळ्यातील दराप्रमाणेच आहेत. काही भाजीपाल्यांचे दर कमी झाल्याचेही दिसून येत आहे.
नाशिकहून येतात टमाटा...
जालना येथील बाजारपेठेत नाशिक व परिसरातील टमाटा विक्रीसाठी येतात. शिवाय शेजारील बुलडाणा, परभणी, बीड जिल्ह्यातील शेतकरीही आपला माल जालना येथील बाजारपेठेत विक्रीसाठी आणतात. शिवाय जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याचे उत्पादन होते.
गृहिणी म्हणतात...
कोरोनामुळे आर्थिक स्थिती कोलमडली आहे. त्यात भाजीपाल्याचे दरही अधिक वाढलेले आहेत. त्यामुळे महिन्याचे आर्थिक गणित बिघडत असून, हे दर पाहता काही भाज्या घ्याव्या की नको? असा प्रश्न निर्माण होतो.
-संगीता वाघमारे
भाजीपाला असो किंवा इंधन असो वाढलेल्या दरवाढीचा आम्हा सर्वसामान्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे ही दरवाढ कमी होण्यासाठी केंद्र, राज्य शासनानेच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे.
- रागिणी राखे
व्यापारी म्हणतात....
बाजारपेठेत मालाची आवक कमी झाली आहे. त्यात बाहेरून येणाऱ्या मालाच्या खरेदीला अधिक पैसे मोजावे लागतात. त्यामुळे बाजारपेठेत विक्री होणाऱ्या भाजीपाल्याचे दर अधिक वाटतात.
- प्रकाश शिंदे
ग्रामीण भागातून भाजीपाला खरेदी करून शहरात आणायचा म्हटलं की खर्च येतो. शिवाय साठवणुकीसह इतर बाबींवर खर्च होतो. मालाची आवक कमी असल्याने सध्या दर अधिक आहेत.
- हनुमान घाडगे